जेईई, नीटच्या धर्तीवर एमएच सीईटी परीक्षा

इंजिनियरींग, मेडिकलसाठी विद्यार्थ्यांना द्यावा लागणार दोन परीक्षा

Mumbai
एमएचटी सीईटी

पर्सेंटाईल गुणपद्धतीमुळे उडलेला गोंधळ व पीसीएम गटातील विद्यार्थ्यांनी पीसीएमबीच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणावर घेतलेले आक्षेप यामुळे 2020-21 च्या शैक्षणिक वर्षासाठी जेईई व नीटप्रमाणे एमएच-सीईटीची परीक्षा पीसीएमबी गटाऐवजी पीसीएम व पीसीबी या दोनच गटांमध्ये परीक्षा घेण्याचा विचार सीईटी सेलमार्फत करण्यात येत आहे. यांसदर्भात ऑक्टोबरमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांनकडून तक्रारी व मते मागवण्यात येणार असून, त्यानंतरच निर्णय घेण्यात येणार आहे.

राज्यस्तरावरील मेडिकल अभ्यासक्रमासाठी पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र), इंजिनियरिंगसाठी पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) तर मेडिकल व इंजिनियरिंग या दोन्ही अभ्यासक्रमांना प्रयत्न करणार्‍या विद्यार्थ्यांना पीसीएमबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र) गटाची परीक्षा द्यावी लागते. राज्यातल्या गुणवान विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी आणि वैद्यकीय विद्याशाखांकडे प्रामुख्याने ओढा असतो. यासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा घेण्यात येते. याच परीक्षेच्या आधारावर अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिले जातात. यंदा ही परीक्षा प्रथमच ऑनलाइन घेण्यात आली होती.

राज्यातील 36 जिल्हांच्या ठिकाणी 166 परीक्षा केंद्रावर ऑनलाइन पध्दतीने 10 दिवस 19 सत्रामध्ये घेण्यात आली. प्रथमच सेंट्रल बेसलाइन टेस्ट झाल्याने या परीक्षेचा निकाल पर्सेन्टाइल पद्धतीने जाहीर केला आहे. परीक्षेसाठी देशभरातून तब्बल 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पसंतीनुसार अभ्यासक्रम निवडणार्‍या विद्यार्थ्यांना पीसीएम, पीसीबी व पीसीएमबी या तीन गटातून परीक्षा देण्याची संधी सीईटीने उपलब्ध करून दिली. मात्र पीसीएमबी विषयांची एकत्रित परीक्षा देणासाठी विद्यार्थ्यांना लागणारा कालावधी व पर्सेन्टाईलबाबत आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पीसीएमबीऐवजी विद्यार्थ्यांना पीसीएम व पीसीबी अशा दोन्ही स्वतंत्र परीक्षा देण्याबाबत सीईटी सेलकडून विचार सुरू आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) नुकत्याच झालेल्या एका बैठकीत पीसीएमबी परीक्षा रद्द करण्याचा विचार मांडण्यात आला. त्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या सूचना व तक्रारी विचारात घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी संकेतस्थळावर 1 ते 31 ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना आपल्या सूचना व मते मांडता येणार आहेत. 1 ऑक्टोबरला एआरएच्या होणार्‍या बैठकीत हा प्रस्ताव ठेवून यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

चार लाख विद्यार्थ्यांनी केली होती नोंदणी
एमएच-सीईटी परीक्षेसाठी देशभरातून तब्बल 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर त्यापैकी 3 लाख 92 हजार 454 विद्यार्थी बसले होते. पीसीबी गटात एक लाख 16 हजार 188 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर पीसीएमबी गटातून 1 लाख 64 हजार 966 आणि पीसीएम गटातून 1 लाख 11 हजार 200 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

पीसीएमबीच्या विद्यार्थ्यांच्या पर्सेटाईल गुणावर काही विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे हा गोंधळ दूर करण्यासाठी प्रवेश परीक्षा प्राधिकरणाच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावर विद्यार्थ्यांच्या सूचना मागवून निर्णय घेण्यात येणार आहे.
– आनंद रायते, आयुक्त, सीईटी सेल