गिरणी कामगारांसाठी म्हाडाचा तळ कोकणात

२५० गिरणी कामगारांनी घेतला समुपदेशनाचा लाभ

Mumbai
Mhada

उतारवयात हक्काच्या घरासाठी मुंबई गाठणार्‍या गिरणी कामगारांच्या फेर्‍या कमी करण्यासाठी म्हाडाकडून एक पाऊल पुढे टाकण्यात येणार आहे. मुंबई गाठणे ही खर्चिक तसेच न परवडण्यासारखे आहे. म्हणूनच महिन्यातील एक दिवस तरी संपूर्ण म्हाडा यंत्रणा रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही म्हाडाचे अध्यक्ष माननीय उदय सामंत यांनी नुकतीच रत्नागिरी येथे बोलताना दिली आहे. म्हाडातर्फे नुकतेच गिरणी कामगारांकरीता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

’मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न महत्वाचा आहे. त्यांना घरकुल उपलब्ध करुन देणे ही म्हाडाची जबाबदारी आहे. त्यातच मुंबईतील गिरणी कामगार हा प्रामुख्याने कोकणातीलच माणुस आहे. त्यामुळे त्यांच्या सोईचा विचार करुनच गिरणी कामगारांसाठी कोकणातच मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्याचा आमचा मानस होता. हा महाराष्ट्रातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम असुन त्याची सुरवात रत्नागिरीतून झाली आहे.’’ अशी माहिती यावेळी सामंत यांनी दिली. या मार्गदर्शन शिबिराला जिल्ह्यातील गिरणी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. गिरणी कामगारांसाठी राबविण्यात येणार प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन आहे. त्यामुळे सहाजितच त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पारदर्शक कारभार केला जातो. म्हाडा या प्रक्रियेव्यतिरीक्त कुठल्याही मार्गाने घरांचा व्यवहार करीत नाही. त्यामुळे दलालांच्या कुठल्याही प्रकारच्या आमिषाला कुणीही बळी पडु नये. म्हाडा दलालांमार्फत घरांचा व्यवहार करत नाही. अशा प्रकारची कुठलीही तक्रार प्राप्त झाल्यास संबधीतावर तत्काळ कारवाई केली जाईल, असा इशारा देखील यावेळी उदय सामंत यांनी दिला.

कामगार आपल्या आयुष्यभराची कमाई आपले गृहस्वप्न पूर्ण करण्यासाठी घालवतात. त्यामुळे कामगारांनी पूर्ण विश्वासाने या प्रक्रियेत समाविष्ट व्हावे. ऑनलाईन नोंदणी झालेल्या १ लाख ७४ हजार १७२ गिरणी कामगारांना घर मिळणारच आहे. या प्रक्रियेमध्ये दोनवेळा नावं असलेली सुमारे २९ हजार नावे रद्द करण्यात आली असल्याची माहिती देखील त्यांना यावेळी दिली. आतापर्यंत १० हजार घरांची यापूर्वी लॉटरी प्रक्रिया झाली आहे. आता उर्वरीत तीन मिलची लॉटरी प्रक्रिया लवकरच होणार आहे. सुमारे ५ हजार ९० घरांसाठी ही लॉटरी असणार आहे. भविष्यात आणखी १५ हजार घरांचा मोठा प्रकल्प बांधण्याचा मानस आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here