म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्पचे कोट्यवधींचे भाडे थकीत

योग्य भाडे आकारण्याची विकासकांची मागणी

Mumbai

म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्पचे भाडे थकविणार्‍या विकासकांकडून या वर्षभरात १६२ कोटी रूपये वसुली करण्याचे उद्दिष्ट यंदाच्या वर्षासाठी ठेवण्यात आले आहे. अनेक प्रकरणात चुकीच्या पद्धतीने भाडे आकारणी करण्यात आली असल्याने आता सुधारीत प्रस्ताव म्हाडाच्या दुरूस्ती आणि पुर्नरचना मंडळाने आता प्राधिकरणाकडे पाठविला आहे. एकूण ४३ विकासकांकडून १६२ कोटी रूपये गेल्या अनेक वर्षांपासून थकीत आहेत. प्राधिकरणाच्या बैठकीत या प्रस्तावावर आगामी दिवसात निर्णय होणे अपेक्षित आहे.

म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्पची घरे अनेक खाजगी विकासकांकडून पुनर्वसनाच्या प्रकल्पाअंतर्गत गेल्या काही वर्षात वापरण्यात आली. पण अनेक प्रकरणात विकासकांकडून भाडे आकारणीसाठी एकच पद्धत न अवलंबल्याने एकूण ६ ते ७ विकासकांनी न्यायालयाचे दार ठोठावले आहे. चुकीच्या पद्धतीने आकारलेल्या भाड्यामध्ये दुरूस्ती व्हावी अशी मागणी विकासकांची आहे. काही प्रकरणात विकासकाने वापरलेली ट्रान्झिट कॅम्पची घरेदेखील तोडण्यात आली आहे. तरीही याठिकाणची भाडेआकारणी सुरू आहे असे विकासकांनी म्हाडाच्या लक्षात आणून दिले आहे. तर काही प्रकरणात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भाडे आकारले असल्याचे विकासकांनी म्हाडाला निदर्शनास आणून दिले आहे. एकसमान पद्धतीने ही भाडे आकारणी व्हावी, अशी मागणी विकासकांकडून करण्यात आली आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने ज्या प्रकरणात भाडे आकारण्यात आले आहे, अशा प्रकरणात भाडे दुरूस्ती करावी, अशी विकासकांची मागणी आहे.

अशी आहे थकबाकी
म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्प वापरलेल्या प्रकरणात एकूण ८४ कोटी रूपयांची थकबाकी आहे. तर थकबाकीच्या रकमेवर एकूण ७८ कोटी रूपयांचे व्याज आकारण्यात आले आहे. एकूण ४३ विकासकांकडून म्हाडाच्या २५०० सदनिकांचा वापर ट्रान्झिट कॅम्पसाठी करण्यात आला होता. अनेक वर्षांपासून ही थकबाकी न भरली गेल्याने व्याजाची रक्कमही वाढली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here