10 वर्षे म्हाडाचे घर विकता येणार नाही

Mumbai
mhada
म्हाडा

सर्वसामान्यांच घराच स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षात पूर्ण झाले आहे. पण हीच घरे विकण्याचे सर्रास प्रकार आढळले आहेत. म्हणूनच म्हाडाचे घर १० वर्षे विकता येणार नाही अशी नवीन अट म्हाडाकडून घर विजेत्यांसाठी यापुढच्या काळात घालण्यात येणार आहे. म्हाडाच्या सध्याच्या अटीनुसार पाच वर्षांपर्यंत घर विक्री करता येत नाही. पण ही मर्यादा दहा वर्षापर्यंत वाढवण्यासाठीचा प्रस्ताव म्हाडाचे मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी प्राधिकरणासमोर ठेवला आहे.
येत्या प्राधिकरणाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होईल, असे अपेक्षित आहे असे मधू चव्हाण यांनी दै. ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले. अनेक अर्जदार म्हाडाच्या घरांसाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करतात. तसेच म्हाडाच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण सातत्याने अनेक सोडतीमध्ये अर्जदेखील करत असतात.

पण अनेक घर विजेते हे घराचा ताबा मिळाल्यानंतर ते काही वर्षातच विकून टाकतात. म्हाडाच्या घरांसाठी पैशाचे आमिष दाखवणारे दलालांच्या प्रलोभनामुळे ही घरे काही थोडक्या रकमेसाठी विकण्यात येतात. म्हणूनच अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी म्हाडाकडून घर विक्रीसाठीचा कालावधी वाढवण्याची अट घालण्यात येणार असल्याचे मधू चव्हाण म्हणाले. म्हाडा घर स्वस्त किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी काही योजनांमध्ये सबसिडीच्या रूपात रक्कम मोजते. तर काही योजनांमध्ये म्हाडा घर स्वस्तदेखील उपलब्ध करून देते.अनेकदा ही घरे बाजार भावापेक्षा अतिशय कमी किमतीने उपलब्ध करून देण्यात येतात. सर्वसामान्यांना घर परवडणार्‍या दरात मिळावे तसेच शहराअंतर्गत मिळावे या उद्देशाने लॉटरी प्रक्रिया म्हाडाकडून राबविण्यात येते. पण अनेकांनी याचा गैरफायदा घेत आर्थिक हेतूच साध्य केला असल्याचे ते म्हणाले. म्हाडाच्या घरांच्या विक्रीचा कालावधी वाढवण्यासाठी म्हाडापुढे प्रस्ताव अपेक्षित असल्याचे प्रशासनातील एका अधिकार्‍याने स्पष्ट केले.

पवईच्या अर्जकर्त्यांसाठी म्हाडाचा पुनर्विचार
पवईच्या घरांसाठी अर्ज केलेल्यांपैकी आज काही जण मला लॉटरीआधी भेटले. या अर्जकर्त्यांनी घराच्या किमती अधिक आहेत असे सांगत घरे परत केली होती. पण घरांच्या किंमती कमी झाल्यानंतर आता हे मूळ अर्जदारच बाजूला पडले आहेत. त्यामुळेच ज्यांच्यामुळे म्हाडाला हा निर्णय घ्यावा लागला, त्यांच्यासाठी म्हाडा सहानभूतीपूर्व विचार करत आहे. या ३० ते ३५ अर्जकर्त्यांसाठी काय करता येईल यासाठी म्हाडा विचार करत असल्याचे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत दिले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here