मायक्रोसॉफ्ट देणार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

देशातील विद्यार्थ्यांना दर्जेदार ऑनलाइन शिक्षण मिळावे या उद्देशाने अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) मायक्रोसॉफ्टसोबत करार केला आहे.

देशातील विद्यार्थ्यांना दर्जेदार ऑनलाइन शिक्षण मिळावे या उद्देशाने अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) मायक्रोसॉफ्टसोबत करार केला आहे. यामाध्यमातून विद्यार्थ्यांना सुमारे दीड हजारहून अधिक कोर्सेस उपलब्ध होणार आहेत.

देशातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे तंत्र शिक्षण मिळावे या उद्देशाने एआयसीटीईने हा करार केला आहे. या करारानुसार विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना दीड हजार कार्यक्रम मोफत उपलब्ध होणार आहेत. यासाठी https://free.aicte-india.org/ हे विशेष वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलवरून विद्यार्थी व शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘मायक्रोसॉफ्ट लर्न’ हे व्यासपीठ बनवले आहे. विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धीमत्ता, आयओटी, डेटा सायन्स आणि क्लाउड कम्प्युटिंगसारखे विषय शिकता येणार आहेत. १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांना त्यांचे स्वत:चे अ‍ॅप विकसित करणे, कृत्रिम बुद्धीमत्तेचे प्रयोग करणे असो प्रयोगही करता येणार आहेत. यासाठी मायक्रोसॉफ्टने ‘अझूर फॉर स्टुडंट’ हे व्यासपीठ उपलब्ध केले आहे. यात विद्यार्थ्यांना माहितीचा मोठ्या प्रमाणावर खजिना उपलब्ध होणार आहे. तर शिक्षकांसाठी ‘मायक्रोसॉफ्ट लर्न फॉर एज्युकेटर्स’ हे व्यासपीठही तयार केले आहे. यात मायक्रोसॉफ्टने शिक्षकांसाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमाचा समावेश आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना मायक्रोसॉफ्टचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.

विद्यार्थ्यांना काळानुरुप शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या नोकरी मिळण्याच्या संधीही वृद्धींगत होतील असे मत एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले. तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत शिक्षण देण्यासाठी हा करार महत्त्वपूर्ण असेल असेही ते म्हणाले. कोरोनामध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग व्हावा व त्यांच्या कौशल्यांना योग्य दिशा मिळावी या उद्देशाने हा करार करण्यात आल्याचे मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष अनंत महेश्वरी यांनी सांगितले.