महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुस्तकांची कोट्यवधींची उलाढाल

भारतीय संविधानला सर्वाधिक मागणी

Mumbai
CHAITYABHOOMI-Book stall

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे उभारलेल्या पुस्तकांच्या स्टॉल्सवर ‘भारतीय संविधान’, ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पुस्तकांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. पुस्तके विक्रीसाठी औरंगाबाद, नागपूर, मुंबई, वर्धा, गोंदिया येथील प्रकाशकांनी मोठ्या प्रमाणात स्टॉल्स लावले असून, या स्टॉल्सवर ‘भारतीय संविधान’ व ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’च्या विक्रीतून अवघ्या काही दिवसांत कोट्यवधींची उलाढाल होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी 6 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर येतात. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून भीम अनुयायींप्रमाणेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी दादरमध्ये येत असतात.

तीन वर्षांपासून यामध्ये पंजाबमधील अनुयायीही मोठ्या प्रमाणात येत आहेत. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने येणार्‍या भीम अनुयायींचा बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा व पुस्तके खरेदी करण्याकडे सर्वाधिक कल असतो. आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तके व गौतम बुद्धांसंदर्भात माहिती देणारी पुस्तकांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येते. परंतु यामध्ये भीम अनुयायींचा सर्वाधिक कल हा ‘भारतीय संविधान’ आणि ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ही पुस्तके खरेदी करण्याकडे सर्वाधिक असतो. त्यामुळे प्रत्येक पुस्तक विक्रेता ही दोन पुस्तके मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणत असतो. त्याचबरोबर लेखक धनंजय कीर यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या पुस्तकालाही मोठ्या प्रमाणात मागणी असते. महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कमध्ये लावलेल्या स्टॉल्सपैकी लहान स्टॉल्सधारकांकडून दिवसाला विक्रीसाठी 50 ते 100 ‘भारतीय संविधान’ हे पुस्तक विक्रीसाठी ठेवण्यात येते. तर मोठ्या स्टॉल्सधारकांकडून पाच ते सहा बॉक्स विक्रीसाठी ठेवण्यात येतात.

‘भारतीय संविधाना’ची विक्री 250 रुपयाला होत असून, पुस्तकाची बांधणी, त्यांचे प्रिटींग व कलर याप्रमाणे त्याच्या किमतीमध्ये बदल होत असल्याचे स्टॉल्सधारकांकडून सांगण्यात आले.‘भारतीय संविधाना’प्रमाणेच ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पुस्तकाला सर्वाधिक मागणी आहे. त्यापाठोपाठ आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचेही स्टॉल्सधारकांकडून सांगण्यात आले. प्रत्येक प्रकाशक त्यांच्याकडील विविध प्रकारची पुस्तके स्टॉल्सवर ठेवतात. प्रत्येक स्टॉलवर 50 ते 300 प्रकारची विविध प्रकारची पुस्तके विक्रीसाठी ठेवलेली आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त लहान स्टॉलवर तीन ते पाच हजार पुस्तकांची तर मोठ्या स्टॉलवर किमान 40 ते 50 हजार पुस्तकांची विक्री होत असते. ही पुस्तके 30 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंतची मिळत आहेत. त्यामुळे दोन ते तीन दिवसांत प्रत्येक स्टॉलवर किमान 10 लाखांच्या पुस्तकांची विक्री होते.

शिवाजी पार्कमध्ये जवळपास 100 पेक्षा अधिक पुस्तकांचे स्टॉल्स असल्याने ही उलाढाल सहा ते सात कोटींच्या घरात होते, अशी माहिती स्टॉल्सधारक असलेले औरंगाबदमधील कौशल्य प्रकाशनचे संतोष कांबळे यांनी दिली. संतोष कांबळे यांनी दोन दिवसांत किमान तीन लाखांची पुस्तके विकली असून, महापरिनिर्वाण दिनी हा आकडा दुप्पटीपेक्षा अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार आम्ही आज ‘भारतीय संविधान’ या पुस्तकांचे 10 पेक्षा अधिक बॉक्स व अन्य पुस्तके मोठ्या प्रमाणात मागवले असल्याचे त्यांनी सांगितले.

आमचा लहान स्टॉल आहे. पण आम्ही दिवसाला किमान 50 ‘भारतीय संविधान’ हे पुस्तक विक्रीसाठी ठेवत आहोत. या पुस्तकांची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे. महापरिनिर्वाण दिनी या पुस्तकाची अधिक विक्री होईल, असा विश्वास नालासोपारा येथील मैत्री बौद्ध साहित्य प्रकाशनचे सुनील कांबळे यांनी सांगितले.

पावसाची भिती नाही

गतवर्षी महापरिनिर्वाण दिन व त्याच्या आदल्यादिवशी असा सलग दोन दिवस पाऊस झाला होता. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. स्टॉल लावता न आल्याने पुस्तकांची विक्रीच न झाल्याने मोठे नुकसान झाले होते. परंतु यावेळी पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यावर्षी मोठ्या प्रमाणात व्यवसाय होईल, असा विश्वास अनेक स्टॉलधारकांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here