इम्तियाज जलील बंडखोरीच्या तयारीत?

औरंगाबादमध्ये एमआयएमसमोर मोठा पेच!

Mumbai
mim mla imtiaz jalils petition in high court to cancel the maratha reservation
एमआयएम पक्षाचे आमदार इम्तियाज जलील

वंचित बहुजन विकास आघाडीची घोषणा झाल्यापासून आघाडीत सारे काही आलबेल असल्याचेच चित्र होते. अगदी मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांनी कंठरवाने आघाडीचा जयघोष केला होता. आता मात्र आघाडीमध्ये बंडखोरीचे निशाण फडकते की काय? अशी चिन्हे दिसू लागली आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे हे निशाण एमआयएमचा चांगला प्रभाव असलेल्या औरंगाबादमध्येच उभारले जाण्याची शक्यता आहे.

एमआयएमचे औरंगाबादमधील आमदार इम्तियाज जलील यांनी पक्षाकडे औरंगाबादमधून लोकसभेच्या तिकिटाची मागणी केली आहे. मात्र, या मतदारसंघात आधीच आघाडीने जनता दलाच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे इम्तियाज जलील यांचा पत्ता आपोआप कट झाला आहे. ‘पक्षाने एक तरी जागा लढवायलाच हवी अशी माझी भूमिका आहे’, असे इम्तियाज जलील यांनी ’आपलं महानगर’शी बोलताना सांगितले.

पक्षाने बी. जी. कोळसे पाटलांना आघाडी म्हणून पाठिंबा जाहीर केला आहे. पण पक्षाने एक तरी जागा लढवलीच पाहिजे. मी औरंगाबादमध्ये काम केले आहे. त्यामुळे इथून तिकीट मिळावे अशी माझी नक्कीच इच्छा आहे. जर ही मागणी मान्य झाली नाही तर पुढे काय करायचे याचा निर्णय माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून घेईन.                        – इम्तियाज जलील, आमदार, एमआयएम

हा तर पब्लिसिटी सिंड्रोम!

एकीकडे जलील यांच्या बोलण्यातून बंडाळीची शक्यता डोके वर काढत असतानाच आघाडीचे प्रणेते प्रकाश आंबेडकर यांनी मात्र या वादातून अंग काढून घेत, काही लोकांना पब्लिसिटी सिंड्रोम असतो, असे खोचक विधान केले आहे.

काही लोकांना पब्लिसिटी सिंड्रोम असतो. पण ते आमचे मित्र पक्ष आहेत. आपापसात बोलून ओवेसी आणि एमआयएम पक्ष यावर तोडगा काढतील. आणि तिथून कुणी लढावे याचा निर्णय घेतील.- प्रकाश आंबेडकर, प्रणेते, वंचित बहुजन आघाडी

बी. जी. कोळसे पाटलांना वंचित विकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, इम्तियाज जलील यांच्या मुद्यावर आता पक्षाध्यक्षच निर्णय घेतील.– वारिस पठाण, आमदार, एमआयएम

मुंबईतून वारिस पठाण यांना उमेदवारी?

दरम्यान, दक्षिण मुंबईतून विद्यमान आमदार वारिस पठाण यांना खासदारकीची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. आघाडीतील प्रमुख नेतेमंडळींकडून वारीस पठाण यांना निवडणूक लढवण्याची गळ घातली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच ‘मुंबईतल्या जागांबद्दलचा निर्णय एमआयएमशी चर्चा करून घेतला जाईल’, असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे पुढच्या उमेदवारयादीत वारीस पठाण यांचेदेखील नाव असण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here