बेपत्ता वृद्धाचा मृतदेह गटारात

उघड्या चेंबरचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Mumbai

नालासोपार्‍यात गटाराच्या उघड्या चेंबरमध्ये पडून चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच विरारमध्ये सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका 90 वर्षीय वृद्ध इसमाचा मृतदेह गटारात सापडल्याने उघड्या चेंबरचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

90 वर्षीय कृष्णा कुपेकर गेल्या 15 फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. त्यांच्या कुुटुंबियांनी शोध घेतला असता ते सापडत नव्हते. अखेर गुरुवारी संध्याकाळी कुपेकर यांचा मृतदेह विरार पश्चिमेकडील म्हाडा परिसरातील एका गटारात आढळला. अर्नाळा पोलिसांनी वसई विरार महापालिकेच्या अग्नीशमन दलाच्या जवानांच्या मदतीने त्यांच्या मृतदेह शोधून काढला.

या परिसरात गटारावर चेंबरवर झाकणे नाहीत. त्यावरून पायी चालत असताना वृद्ध कुपेकर यांचा तोल जाऊन उघड्या चेंबरमधून ते गटारात पडले असावेत, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेल्या महिन्यात नालासोपार्‍यात उघड्या चेंबरमधून पडून एका चिमुकलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गुरुवारी उघड्या चेंबरमध्ये पडून कुपेकर यांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने उघड्या चेंबरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिका हद्दीत अनेक ठिकाणीच्या चेंबरवर झाकणे नाहीत. पण, महापालिकेकडून झाकणे बसवण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप केला जात आहे.