घरमुंबईमिठीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजपाल हांडे यांचे निधन

मिठीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजपाल हांडे यांचे निधन

Subscribe

डॉ. राजपाल हांडे यांनी प्राणीशास्त्र विषयात त्यांनी एमएससी,पीएचडी पूर्ण केली. यानंतर त्यांना ३३ वर्षांचा शिक्षकी पेशाचा अनुभव होता.

मुंबई विद्यापीठाचे माजी कॉलेज व विद्यापीठ विकास मंडळाचे माजी संचालक आणि मिठीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजपाल हांडे यांचे गुरुवारी संध्याकळी हृदय विकाराने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. एन्जिओप्लास्टीसाठी त्यांना चार दिवसांपूर्वी मुलुंड येथील फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिक्षणात मोलाचे योगदान देणाऱ्या डॉ. हांडे यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

३३ वर्षांचा होता शिक्षकी पेशाचा अनुभव

डॉ. राजपाल हांडे यांनी प्राणीशास्त्र विषयात त्यांनी एमएससी,पीएचडी पूर्ण केली. यानंतर त्यांना ३३ वर्षांचा शिक्षकी पेशाचा अनुभव होता. मुलुंड येथील वझे केळकर कॉलेजमधून त्यांनी विद्यादानाच्या कामास सुरुवात केली. यानंतर त्यांनी के. जे. सोमय्या कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम केले. तसेच ताडदेव येथील एनएसएस कॉलेजच्या प्राचार्य पदाची धुराही त्यांनी सांभाळली होती.

- Advertisement -

विविध विभागांची सांभाळली धुरा

मुंबई विद्यापीठातील कॉलेज व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. या कालावधीत त्यांनी विद्यापीठाशी संलग्नित ७८० कॉलेजांची तसेच विद्यापीठातील विविध विभागांची धुरा सांभाळली. या काळात चीनमधील आघाडीच्या विद्यापीठांना भेटी देण्यासाठी भारतातून गेलेल्या प्राचार्य व संस्थांचे संचालक प्रतिनिधीच्या मंडळाचे नेतृत्व करताना शैक्षणिक सहकार्यासाठी चीनमधील तीन प्रमुख विद्यापीठांसह सामंजस्य करार त्यांनी केला होता. डॉ. राजपाल हांडे यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधन प्रबंध सादर केले आहेत. अलीकडेच त्यांनी लिहिलेले ‘मूल्यांकन आणि मान्यता, उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढ’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते.

निधनामुळे शिक्षण क्षेत्रात पोकळी

महाराष्ट्र शासनाने अमेरिकेतील आयलिनोइस युनिव्हर्सिटी यांच्याशी शैक्षणिक सामंजस्य करार केल्यानंतर, डॉ. राजपाल हांडे यांची मुंबई विद्यापीठाच्या वतीने संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २०१३ साली जुलै महिन्यात दक्षिण कोरियातील वर्ल्ड कल्चर कॅम्प येथे पार पडलेल्या वर्ल्ड एज्युकेशन लीडर्स फोरममध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची भावाना इतर कॉलेजांचे प्राचार्य आणि विद्यापीठ अधिसभा सदस्य यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, मुलगा व सून असा परिवार आहे.


‘एकत्र बसून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे पत्ते पिसले…’; सामना अग्रलेखातून विरोधी पक्षाचा समाचार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -