‘कंगना भाजपची पोपट’आमदारांचा कंगनाविरुद्ध आक्रोश

kangna ranaut
अभिनेत्री कंगना रनौत

मुंबईची पाकव्यात काश्मीरशी तुलना करून महाराष्ट्राचा अपमान करणार्‍या अभिनेत्री कंगनाला वाय प्लस सुरक्षा देण्यात आल्यामुळे राज्यातील लोकप्रतिनिधींमध्ये संतापाची लाट पसरली असून महाराष्ट्र विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनात सुद्धा आमदारांमध्ये कंगनाविरुद्धचा रोष प्रकर्षाने दिसून आला. काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी, ‘कंगना भाजपची पोपट असून तिला वाय सुरक्षा नको तर चक्क झेड प्लस सुरक्षाच द्या’, अशी टीका केली. काँग्रेससह शिवसेना आणि समाजवादी पक्षाच्या आमदारांनी सुद्धा कंगनाच्या वक्तव्यांचा निषेध केला आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करताना त्याला ड्रग्स अर्थात अमली पदार्थ आणि बॉलिवूड कनेक्शन लागले आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत. कंगनाने काहींची नावे जाहीर करणार असल्याचे म्हटले. त्यावर काही कलाकार कंगनाचे सुद्धा नाव घेत आहेत. त्यामुळे ड्रग्स आणि बॉलिवूड कनेक्शनचा तपास करत असताना कंगनाचा ड्रग्स कनेक्शन काय आहे याचा देखील तपास व्हायला हवा, अशी मागणी शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी केली.

बॉलिवूडमध्ये वंशवादावर बोलता बोलता कंगना इस्लामिक बॉलिवूडमध्ये डिइस्लामिक कल्चर आणत असल्याचे दावे करत आहे. म्हणजे, मुस्लीम किंवा अल्पसंख्याक समाजातील व्यक्ती बॉलिवूडमध्ये काम करत असेल तर त्या विरोधात मी आवाज उठवते आणि यामुळेच माझे जीव धोक्यात टाकले गेले असेही ती सांगत आहे. असले लोक महाराष्ट्राचा अपमान करतात. त्यांना कुणीही पाठिंबा देऊ नये. अशांना महाराष्ट्रातून हाकलून लावायला हवे, असे समाजवादी पार्टीचे नेते अबु आझमी म्हणाले.