मेट्रो लाईन 2 बी मधून कुर्ला स्टेशन वगळले

Metro 2 B
मुंबई महानगरात मेट्रोचे जाळे पसरविण्याचे काम सुरु आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत मेट्रो लाईन 2 बी डी एन नगर ते मंडाळे यामधील कुर्ला स्टेशन वगळण्यात आले आहे. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर ए राजीव यांस पत्र पाठवून  कुर्ला स्टेशन न वगळण्याची मागणी केली आहे.
मेट्रो लाईन 2 बी ही पश्चिम आणि पूर्व उपनगरांला जोडणारी असून कुर्ला स्टेशन हे महत्वाचे आहे. मेट्रो 2 बी चा DPR आणि निविदेत कुर्ला स्टेशन आहे पण आता हे स्टेशन वगळण्यात येत आहे. अन्य बीकेसी स्टेशन हे एकत्रित करण्यात येत आहे पण कुर्ला हे सरळसरळ वगळण्यात येत आहे. कुर्ला स्टेशन हे कुर्ला टर्मिनससाठी महत्वाचे आहे.
एमएमआरडीएचा हेतू खरोखरच प्रामाणिक असेल तर मग जाहीर नोटीस देऊन जनतेच्या सूचना, हरकती आणि आक्षेप का मागविले नाही? असा सवाल गलगली यांचा आहे. तसेच रेल्वे टर्मिनसला 2 बी मेट्रोची जोडण्यासाठी एमएमआरडीएने प्राधान्य का दिले नाही? ही चौकशीची बाब असून कुर्ला स्टेशन का वगळण्यात आले ही बाब अनाकलनीय आहे, असे  मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले आहे.
मेट्रो २ ब च्या बाबतीत एमएमआरडीची डेडलाईन याआधीच हुकली आहे. त्यामुळे यापुढच्या काळातही मेट्रो २ ब प्रकल्पासाठी अनेक आव्हानांना एमएमआरडीएला तोंड द्यावे लागणार आहे. कंत्राटदारांना अपेक्षेपेक्षा कमी वेगाने काम केल्याने एमएमआरडीएने याआधीच काही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे एमएमआरडीएवर आता नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याची वेळ आली आहे. त्यामध्येच आता कुर्ला स्टेशनच्या निमित्ताने एका नव्या विषयाची भर पडलेली आहे.