MTNL च्या कार्यालयावर मनसेची धडक!

mns letter to mtnl by yashwant killedar

कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर गेले काही महिने लोकांना ऑनलाइन पद्धतीने घरी बसून काम करावे लागत आहे. मात्र एमटीएनएलच्या विस्कळीत सेवेमुळे कामात अडथळा येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यानंतर मनसेने MTNL च्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना याचा थेट जाब विचारला. एमटीएनएलच्या ग्राहकांना गेले ६ ते ७ महिने ब्रॉडबँड तसेच मोबाईल सेवा व्यवस्थित पुरविल्या जात नाहीत. विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन अभ्यासात खंड पडत आहे. घरी काम करणाऱ्या नोकरदारांनाही अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. याबाबत मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी एमटीएनएल कार्यालयात जाऊन याबाबत एमटीएनएलच्या कार्यकारी संचालकांना जाब विचारला.

सेवा बंद असूनही ग्राहकांना आली बिलं!

वर्क फ्रॉम होम ही संकल्पना बऱ्याच खासगी कंपन्यांनी अमलात आणली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा रोजगार सुरक्षित राहिला आहे. शाळा – महाविद्यालयात देखील ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. तर मीटिंग देखील Zoom App द्वारे होऊ लागल्या आहेत. या सर्व मूलभूत सेवा एमटीएनएलकडून त्यांच्या ग्राहकांना पुरवण्यात येतात. नगरिकांना एमटीएनएलची सेवा हवी आहे. तरीही व्यवस्थापन ती चांगल्या प्रकारे देण्यास असमर्थ ठरत आहे. शिवाय सर्व सेवा बंद असताना बिले का पाठविली जातात? असा सवाल देखील किल्लेदार यांनी केला.

ग्राहकांना बिलांचा परतावा मिळणार

सेवा पूर्ववत करण्यासाठी मुंबईतील पाच झोन मध्ये ५ ठेकेदारांची नियुक्ती करण्यात करण्यात येणार असून काम जलद गतीने होण्यासाठी त्यांच्यात कामाची विभागणी करण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांना कालमर्यादा देण्यात आली असून ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास त्यांच्याकडून दंड आकरण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गेल्या ५ ते ६ महिन्यांत सेवा बंद असून ग्राहकांना बिले देण्यात आली असून त्यात त्यांना रिबेट देण्यात येणार असल्याचे आश्वासन एमटीएनएलच्या कार्यकारी संचालकांनी दिल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.