घरमुंबईमनसेही लोकसभेच्या धुळवडीत

मनसेही लोकसभेच्या धुळवडीत

Subscribe

 १९ मार्चला राज ठाकरेंचा मुंबईत मेळावा

लोकसभेचे काय हे मी तुम्हाला नंतर सांगेन, असा शब्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना नुकत्याच झालेल्या पक्षाच्या १३ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दिला होता. याचवेळी मनसैनिकांना लोकसभेसाठी तयारी करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले होते. येत्या निवडणुकीत मनसेकडूनही चांगलाच रंग आणण्याची घोषणा होणे राज ठाकरे यांच्याकडून अपेक्षित आहे. त्यामुळे धुळवडीआधी लोकसभा निवडणुकीच्या आदेशाची मनसैनिक वाट पाहत आहेत. मनसे अध्यक्षांकडून येत्या मेळाव्यात तीन जागांची घोषणा केली जाईल, असे अपेक्षित आहे.

येत्या १९ तारखेला मुंबईत राज ठाकरे आपली लोकसभेची स्ट्रॅटेजी जाहीर करणार आहेत. मुंबईत मेळावा घ्यावा की पुण्यात घ्यावा, याबाबतचा अंदाज घेऊनच अखेर लोकसभेचे बिगुल वाजवण्यासाठी मुंबईवर शिक्कामोर्तब झाले आहे. लोकसभेसाठी आतापर्यंत आघाडीकडून मिळणारी सावत्र वागणूक आणि जागा वाटपामध्ये मनसेचा कोणताही विचार न झाल्याने मनसे पक्षाकडून स्वबळावरच तीन जागा लढवण्याचा निर्धार झाला असल्याचे कळते. ईशान्य मुंबई, कल्याण आणि नाशिक या तीन ठिकाणांतून मनसे आपला उमेदवार देणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आता रंगू लागली आहे. पक्षाला याठिकाणी चांगला पाठिंबा असल्यानेच या तीन जागांवरून लढण्याची तयारी यंदा मनसेकडून करण्यात येणार आहे. मनसेच्या १३ व्या वर्धापन दिनाच्या दिवशी मनसे पक्षप्रमुखांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागा, अशा सूचना दिल्याने एक नवचैतन्य आले आहे. आघाडीत विशेषतः राष्ट्रवादीकडून जाहीर झालेल्या जागा वाटपाच्या दोन याद्यांमध्ये मनसेला एकही जागा सोडण्यात आलेली नाही. त्यामुळेच आघाडीतल्या जागांचे सगळे पर्याय बंद झालेल्या मनसेकडून आता कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठीच या निवडणुकीच्या तोंडावर लोकसभेची कसरत करण्यात येणार आहे.

- Advertisement -

मनसैनिकांनी तयार केली उमेदवारांची यादी
लोकसभेसाठी तळ्यात मळ्यात भूमिकेवरून पक्षाचे धोरण काय असा प्रश्न पडलेल्या मनसैनिकांकडूनच तयार करण्यात आलेली लोकसभेच्या जागांची यादी फेसबुकवर चर्चेचा विषय झाला आहे. कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ कमी करण्यासाठी हा सगळा खटाटोप करण्यात येत आहे. लोकसभेसाठी ठाणे मतदारसंघातून अभिजित पानसे, कल्याणमधून राजू पाटील, शिवडीतून बाळा नांदगावकर, ईशान्य मुंबईतून नितीन नांदगावकर, आणि पालघरमधून अविनाश जाधव यांना पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी फेसबुक पोस्ट सध्या मनसैनिकांमध्ये व्हायरल झाली आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -