घरमुंबईभगतसिंग, बालाकोट, अटलजींच्या अंत्ययात्रेचं फूटेज...राज ठाकरेंचे नवे खुलासे!

भगतसिंग, बालाकोट, अटलजींच्या अंत्ययात्रेचं फूटेज…राज ठाकरेंचे नवे खुलासे!

Subscribe

पनवेलमध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये राज ठाकरेंनी बालाकोट हल्ल्यात मारल्या न गेलेल्या पाकिस्तानी सैन्याचे पुरावे, मोदींच्या सभांमधल्या खोट्या गर्दीचे पुरावे सादर केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पनवेलमध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. मोदींनी गुजरातमध्ये जेव्हा फॉर्म भरला, तेव्हा त्यांच्या मागे असलेल्या गर्दीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र, या व्हिडिओची पोलखोल राज ठाकरेंनी पनवेलच्या जाहीर सभेमध्ये केली आहे. याशिवाय, बालाकोट हल्ल्यात पाकिस्तानचे सैनिक मारले गेलेल्या दाव्याला खुद्द सुषमा स्वराज यांनीच विरोध केला, मग त्या देशभक्त की देशद्रोही? असा सवाल देखील राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

मोदींच्या रोड शोला अटलजींच्या अंत्ययात्रेचे व्हिडिओ

नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये फॉर्म भरताना कशी खोटी गर्दी दाखवली जात होती, याचा आरोप करताना राज ठाकरेंनी एका वृत्तवाहिनीचा व्हिडिओ दाखवला. फॉर्म भरताना मोदींच्या मागे मोठी गर्दी असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र, त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या अंत्ययात्रेतले व्हिडिओ मॉर्फ्ड करून मोदींच्या अर्ज भरतेवेळच्या गर्दीच्या रुपात दाखवले गेल्याचं नंतर या वाहिनीनं केलेल्या रिपोर्टमधून समोर आलं. ‘मोदींनी गुजरातमधून फॉर्म भरला, तेव्हा त्यांच्या मिरवणुकीचा गर्दीचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. पण ते खोटं असल्याचं भाजप मान्य देखील करत नाही. अटल बिहारी वाजपेयींच्या अंत्ययात्रेतले व्हिडिओ मोदींच्या मागची गर्दी म्हणून दाखवली गेली. आणि यावर भाजपकडून आक्षेप घेतला जात नाही. कारण हे जेवढं पसरतंय, तेवढं त्यांच्यासाठी चांगलंच आहे’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

‘अक्षय कुमारने पंतप्रधानांना काय मोठा प्रश्न विचारला. म्हणे पंतप्रधानजी तुम्ही आंबा खाता का? चोखून खाता की कापून खाता? सरकारवर देशातली सगळी जनता अवलंबून असताना यांची मस्करी चालू आहे’ असं म्हणत राज ठाकरेंनी अक्षय कुमारने घेतलेल्या नरेंद्र मोदींच्या मुलाखतीचा देखील समाचार घेतला.

- Advertisement -

‘सुषमा स्वराज देशभक्त की देशद्रोही?’

बालाकोट हल्ल्यात किती माणसं गेली? याचे प्रश्न विचारणारे देशद्रोही आहेत असं बोलणारे पंतप्रधान मोदींचा एक व्हिडिओ यावेळी राज ठाकरेंनी दाखवला. त्यापुढे त्यांनी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी ‘बालाकोट हल्ल्यात कुणीही पाकिस्तानी सैनिक मारला गेला नाही’, असं सांगितल्याची बातमी दाखवली. त्यावर ‘आता सुषमा स्वराज देशभक्त की देशद्रोही हे मोदींनी सांगावं. मोदींनी हे सगळं राजकारण कुणासाठी केलं? आमचे जवान कुणासाठी मेले?’ असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.

‘युती झालीच कशी?’

यावेळी राज ठाकरेंनी शिवसेना-भाजप युतीवर देखील निशाणा साधला. ‘भाजप-शिवसेना आत्तापर्यंत एकमेकांच्या उरावर बसले होते. मग युती झाली कशी? अमित शाह म्हणाले होते, नहीं आये, तो पटक देंगे. दोघेही सत्तेसाठी आणि पैशांसाठी लाचार आहेत’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

- Advertisement -

भगत सिंगांबद्दल मोदींचं अतार्किक विधान

यावेळी राज ठाकरेंनी मोदींनी भगत सिंगांबद्दल केलेल्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला. ‘भगतसिंग तुरुंगात असताना गांधी कुटुंबातलं कुणीही त्यांना भेटायला गेले नाहीत’, असं मोदी व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत. मात्र, त्या वेळच्या द ट्रिब्युन वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातमीनुसार नेहरू २ वेळा भगतसिंगांना भेटायला तुरुंगात गेले होते. आणि तेव्हा इंदिरा गांधी १४ वर्षांच्या होत्या. त्यामुळे गांधी कुटुंबातलं इतर कुणी त्यांना भेटायला जायचा प्रश्नच नाही’, असं स्पष्टीकरण राज ठाकरेंनी यावर दिलं.

कपिल सिब्बल यांची ‘ती’ पत्रकार परिषद…

यावेळी कपिल सिब्बल यांच्या एका पत्रकार परिषदेचा दाखला राज ठाकरेंनी दिला. या पत्रकार परिषदेमध्ये कपिल सिब्बल यांनी ३ लाख कोटी भाजपनं बँकांच्या मदतीनं बदलून घेतले, असा दावा केला. आणि त्यावर भाजपकडून कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाही’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. ‘त्यानंतर झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपनं ओतलेला पैसा आला कुठून? भाजपचं दिल्लीतलं टोलेजंग कार्यालय बांधण्यासाठी भाजपकडे पैसे आले कुठून?’ असा प्रश्न देखील राज ठाकरेंनी यावेळी विचारला.

‘नीरव-मल्ल्याला देशाबाहेर का पळवून लावलं?’

नीरव मोदीसारख्या देशाला लुटणाऱ्यांवर जर आधीच केसेस होत्या, तर ते देशाबाहेर गेले कसे? असा प्रश्न राज ठाकरेंनी यावेळी विचारला. ‘एअरपोर्टला अशा लोकांना अडवलं जातं, मग त्यांना का नाही अडवलं?’ असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. ‘विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी, नीरेश पारे, संजय भंडारी, विक्रम कोठारी, सभ्या सेठ, रितेश जैन, आशिष जोबनपत्रा अशी एकूण ३१ लोकं जनतेचा पैसा लुटून परदेशी फरार झाले आहेत. अशा लुटून नेलेल्या पैशाचा परतावा मिळावा म्हणून रिझर्व्ह बँक असते. पण त्याच बँकेकडून सरकारने शेतकऱ्यांना देण्याच्या नावावर २८ हजार कोटी घेतलेत. मग पैसे नसताना युद्ध कसे लढणार होते हे?’ असाही प्रश्न राज ठाकरेंनी यावेळी विचारला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -