घरमुंबईठाण्यात मनसेचा दखलपात्र मोर्चा

ठाण्यात मनसेचा दखलपात्र मोर्चा

Subscribe

शिवसेना मागील 25 वर्षांपासून ठाण्यावर सत्ता गाजवीत आहे. तसेच राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता आहे. या सरकारच्या पोकळ आश्वासनांविरोधात सोमवारी ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाची सुरुवात तीन हात नाका येथे झाली. दखल घेण्याइतका हा मोर्चा होणार नाही, असे भकीत ठाण्यातील सत्ताधार्‍यांसह प्रशासकीय यंत्रणेनेही वर्तवले होते. मात्र हळूहळू मोर्चात सहभागी होणारा जत्था वाढत गेला. सुमारे दोन हजाराहून अधिक लोक या मोर्चात सामील झाले. त्यामुळे ठाणेकरांसह प्रशासकीय यंत्रणा आणि सत्ताधार्‍यांना या मोर्चाची दखल घेण्याशिवाय पर्याय ठरला नाही. या मोर्चाने ठाण्यातील राजकीय गणिते बदलणार अशी चर्चा आता रंगली आहे.
टोल बंद करणार म्हणून निवडणुकी आधी आंदोलन करणारे शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख पालकमंत्री झाल्यानंतर मात्र टोल कंपनीने दिलेल्या गाडीमधूनच फिरत आहेत. ते काय टोल बंद करणार? टोल फक्त मनसेच बंद करू शकते.

ठाण्यात सर्वात जास्त अनधिकृत बांधकामे एकनाथ शिंदे नगरसेवक असताना त्यांच्या विभागात झाली आहेत. मात्र मंत्री झाल्यानंतर क्लस्टरच्या माध्यमातून हे बांधकाम नियमित करण्याकरिता अट्टाहास करण्यात आला. क्लस्टर राबवणार म्हणत मंत्र्यांनी अनेक वेळा स्वत:चे सत्कार करून घेतले. मात्र क्लस्टर अद्यापही कागदावरच आहे. निवडणुकीपुरता आनंद दिघेंच्या फोटोचा वापर करायचा आणि निवडणुकीनंतर स्वत:चा अजेंडा राबवायचा. आज आनंद दिघे यांच्या कुटुंबाची काय वाताहत आहे? आजही केदार दिघे यांना शिवसेनेचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. विद्यमान आमदार म्हणून ज्या ठिकाणाहून निवडून आला आहात, त्या ठिकाणी एकतरी चांगले काम केल्याचे दाखवून द्यावे, असे जाहीर आवाहन मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मंचावरून केले. यावेळी मंचावर मनसेचे राजू पाटील, विभाग अध्यक्ष महेश कदम, संतोष निकम, विद्यार्थी सेना अध्यक्ष अरुण घोसाळकर, रवी मोरे आदी ठाणे जिह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -