घरमुंबईमनसेतील ‘त्या’ अदृश्य नेत्यांनी माझा घात केला!

मनसेतील ‘त्या’ अदृश्य नेत्यांनी माझा घात केला!

Subscribe

विधानसभा निवडणुकीची धुमश्चक्री ऐन रंगात आलेली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (मनसे) लढवय्या आणि सच्चा मनसैनिक नितीन नांदगावकर यांनी सत्तेत असणार्‍या शिवसेना पक्षात रातोरात प्रवेश केला. त्यांच्या अचानक झालेल्या प्रवेशावर सोशल मीडियातून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. फेसबुकच्या माध्यमातून २७०-८० व्हिडिओजमधून लोकांच्या समस्या जाहीरपणे मांडणार्‍या या नेत्याने जनता दरबार सुरू केला. मात्र मनसे अध्यक्षांनी तो बंद करण्याचे आदेश दिले. शिवाय मनसेच्या उमेदवारी यादीतही नितीन नांदगावकर यांचे नाव नसल्याने नाराज होऊन त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली, असे तर्कवितर्क लढवण्यात आले. या सर्व विषयांवर शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी ‘माय महानगर’च्या खुल्लम खुल्ला या फेसबुक लाईव्हमध्ये स्पष्टीकरण दिले आहे. का द्यावी लागली पक्षनिष्ठेला तिलांजली, काय होती त्यांच्या मनातील खदखद, कोणी फुंकले नांदगावकरांविरोधात राज ठाकरे यांचे कान, या सर्वांची उत्तरं अगदी बिनधास्तपणे त्यांनी यावेळी दिली.

मी ठाकरे कुटुंबाशी निगडित आहे त्याचा मला अभिमान आहे. मी त्याच्या पलीकडे दुसरा विचार करू शकत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्यासमोर मी वाढलो, मी लहानाचा मोठा झालो त्या सर्वांचे दैवत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मी शिवसैनिक म्हणून काम करत होतो नंतर राज ठाकरे यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)त आलो. त्यानंतर अतिशय जबाबदारीने आणि मनापासून स्वतःला मनसेत झोकून दिले. माझ्या पक्षाला चांगले दिवस यावेत आणि त्यासाठी आपणही कुठेतरी खारीचा वाटा घ्यावा यासाठी अनेकदा आयुष्यात तडजोड करण्याची वेळ आली. यासाठी खरंच मनापासून प्रयत्न केले.

मग साम-दाम-दंड-भेद या नितीचा अवलंब केला. समाजकंटकांना सोडायचं नाही, गोरगरीब जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं, त्यांना न्याय द्यायचा. परंतु हे सर्व करत असताना राजसाहेब यांना दैवत मानल होतं. हे कालही म्हटलेलं, आजही आहेत आणि उद्याही राहणार, हे मी कधीही नाकारणार नाही. पंरतु राज ठाकरे यांच्या अवतीभवती जे लोक (नेते मंडळी) आहेत, ते त्यांना खरं चित्र दाखवत नाहीत. शोकांतिका ती आहे. म्हणून मी जे काम करतोय, माझी जी कामाची शैली आहे, ती वेगळी आहे. त्याचा पक्षाला कसा फायदा होईल, सर्व सामान्य जनतेला त्याचा कसा उपयोग होईल, याचा त्या नेत्यांनी विचार करायला हवा होता. माझ्या कामाचा फायदा लोकांसाठी होत असेल तर ती कामं चालू ठेवून पक्ष बांधणीसाठी त्याचा उपयोग कसा होईल, पक्ष कसा वाढेल याचाच मी विचार करत होतो. त्याच दृष्टीने मी काम करत होतो.

- Advertisement -

आमदारकी, खासदारकी, निवडणूक लढवणं याचा मी कधीही विचार केला नव्हता. मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हे स्पष्ट करतो की, मी कधीच राज ठाकरे यांच्याकडे तसेच मनसेच्या नेत्यांकडे आमदारकीची मागणी केली नाही. यंदाच्या निवडणुकीच्या पहिल्या, दुसर्‍या यादीत जी नावं येत होती. त्यात माझं नांव नव्हतं. त्यावेळी ज्यांनी ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्यांना असं वाटलं होती की या यांद्यांमध्ये माझं नावं असणार. ही जी लोकांची आणि मनसैनिकांची इच्छा होती. त्यामुळे मी यादीत नाव नसल्याने पक्ष सोडला अशी चर्चा रंगू लागली.

मला निवडणूक लढवायची आहे, असं मी कोणालाही सांगितलं नाही. माझ्या कामाचे ध्येय ठरलेले होते. मनसेत वाहतूक सेनेचे सरचिटणीस ही जबाबदारी मला देण्यात आली. यादरम्यान, अनेक लोक माझ्याकडे अडचणी घेऊन येऊ लागले म्हणून मला यातूनच जनता दरबार भरवण्याची कल्पना सुचली. त्यासाठी मी कोणाची परवानगी घेतली नाही. त्याकरताही मी राज ठाकरे यांना धन्यवाद देईन, त्यांनी मला अडवलं नाही. मी जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत गेलो, त्यांना न्याय मिळत गेला. पण जसजसा हा दरबार वाढत गेला, मनसेतील अनेक नेत्यांना (जे अदृष्य आहेत) त्यांना ते खटकत होतं. ते राज ठाकरे यांचे कान भरू लागले. नांदगावकर स्वतःला तुमच्याहून मोठा समजायला लागला आहे, हा त्यांना चुकीचा मेसेज देऊ लागले. असा अविश्वास जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याबाबत दाखवला जातो. माझं काम मला बंद करायला लागत असेल, तेव्हा दुखावलं जाणं स्वाभाविक आहे. म्हणून पक्ष सोडायचं ठरवलं.

- Advertisement -

पक्षांतरासाठी हीच वेळ का निवडली ?
निवडणुकीच्या काळात पक्ष सोडण्याचा निर्णय का घेतला याचं स्पष्टीकरण देतो. मी खरंतर सकाळच्या वेळीच उद्धव ठाकरे यांना भेटायला गेलो होतो. परंतु त्यावेळी अनेक लोकांची त्या ठिकाणी ये-जा सुरु होती. मला मात्र उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर बोलायचे होते, माझ बोलणं व्यवस्थित मांडायचं होतं, त्यासाठी निवांत वेळ हवा होता, म्हणून रात्रीच्या वेळी जाऊन भेट घेतली आणि पक्ष प्रवेश केला. शिवाय जी काही लोकोपयोगी कामं मी करतोय त्यासाठी सत्तेत येण्याची गरज होती. जे काही कायदे करायचे आहेत, जे नियम बनवायचे आहेत त्याची एक प्रक्रिया असते, ती सरकारमध्ये राहून करता येईल. हादेखील पक्ष प्रवेशामागील एक विचार होता.

मनसे नेत्यांमध्ये दुफळी निर्माण झालीय का ?
नितीन नांदगावकर यांची वाढती लोकप्रियता आणि पक्षातच असलेले शत्रू यांनी माझा घात केला, असं मी १०० टक्के मानतो. मनसेच्या नेत्यांमध्ये दुफळी आहे. आम्हीच राज ठाकरेंच्या जवळ राहणार. बाकी कोणाला त्यांच्या जवळ येऊ देणार नाही. परंतु असं न होता, जो कार्यकर्ता काम करतो त्यांना पुढे येण्याची संधी मिळाली पाहिजे आणि ही संधी दवडण्याचं काम ही नेत्याची फळी करत आहे. राज ठाकरे हे दूर दृष्टीकोन असलेले नेता आहेत. मात्र त्यांची ही नेतेमंडळी जेव्हा दिशाभूल करतात, तेव्हा खोट्या गोष्टींवरही विश्वास बसू लागतो. तेच माझ्या बाबतीत झालं. तीन महिन्यांपूर्वी राज ठाकरेंना मनातील खदखद सांगितली होती. मी गेलो होतो राजसाहेबांकडे माझी कैफीयत सांगायला. तिथे मी माझं मन व्यक्त केलं. अमित ठाकरे यांनाही माझी व्यथा सांगितली. मात्र माझ्या विरोधात ज्यांनी विष पेरलं त्या तुलनेत मी कुठेतरी कमी पडलो माझी बाजू मांडायला आणि ते यशस्वी झाले माझ्या विरोधात मत बदलण्यासाठी, असं जाणवलं.

मनसेेने तिकीट दिले असते तर …
मला मनसेने निवडणुकीचे तिकीट दिले असते तरीही मी ते नाकारले असते. कारण निवडणूक लढवण्यासाठी करोडो रुपये लागतात आणि तेवढे पैसे माझ्याकडे नाहीत. त्यामुळे मी नम्रपणे निवडणुकीला नकार दिला असता. निवडणुकीचे तिकीट नको, पण त्या नेत्यांनी मला सन्मान द्यावा, एवढीच अपेक्षा होती. माझ्यावर विश्वास दाखवायला होता. असे झाले असते तर पक्षाकडे इतकंच मागितलं असतं की मला उमेदवारी नको फक्त जनता दरबार द्या.

आताच्या आदित्य ठाकरेंच्या शिवसेनेला तुमचा खळ्ळ खट्याक चालेल का ?
नक्कीच चालेल. शेवटी ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. आता जरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पक्ष चालवत असले तरी मुळापासून त्याचा जो गाभा आहे तो शिवसेनाप्रमुखांचा आहे. काळानुसार विचार बदलतात मात्र गाभा तोच राहतो. त्यामुळे माझ्या कामाची पद्धत नक्कीच त्यांना चालणार आहे. माझं व्हिजन स्पष्ट आहे. मी आजही ठाकरे कुटुंबियांसोबतच काम करतोय. जे ठरवलंय ते यापुढेही कायम राहणार आहे. लोकांच्या समस्या सोडवणं आणि त्यासाठी प्रयत्नशील राहणं हेच ध्येय यापुढेही राहणार आहे.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -