कोरोनाग्रस्ताचा मृतदेह ‘बडा कब्रस्तानात’ दफन करण्यास मनसेचा विरोध

आसपासच्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले

Mumbai
प्रातिनिधिक फोटो

दक्षिण मुंबईतील कोरोनाग्रस्त मुस्लिम मृत व्यक्तीला चंदनवाडी येथील बडा कब्रस्थान येथे दफन करण्यास मनसेने विरोध दर्शवला आहे. मागील काही दिवसांमध्ये येथील कब्रस्थानात कोरोनाग्रस्त मुस्लिम व्यक्तींवर अंत्यसंस्कार करत दफन करण्यात आले आहे. त्यामुळे आसपासच्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे मनसेचे उपाध्यक्ष अरविंद गावडे यांनी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांना पत्र पाठवून अशाप्रकारे दफनविधीची क्रिया करण्यास परवानगी देवू नये, असे म्हटले आहे.

महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रामध्ये अरविंद गावडे यांनी मागील काही दिवसांमध्ये चंदनवाडी येथील दफनभूमीत कोरोनाग्रस्त मृत मुस्लिम व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे म्हटले आहे. दोनच दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालेल्या मृतदेहाची विल्हेवाट रात्री उशिरा चंदनवाडी येथील बडा कब्रस्थान येथे लावली आहे. याबाबतची माहिती मिळताच या ठिकाणी राहत असलेल्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण तसेच असंतोष पसरला आहे.

बडा कब्रस्थान शेजारी मोठ्याप्रमाणात मुस्लिम कुटुंबे राहत आहे. सुमारे ६० ते ७० कुटुंबे या ठिकाणी राहत असून त्यांच्याबरोबरच मराठी आणि गुजराती भाषिक कुटुंबेही राहत आहेत. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याबाबत जागतिक आरोग्य संघटना व केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत. त्यानुसार अशाप्रकारच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना कोरोना विषाणूचा संसर्ग कोणाला होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मोठी दफनभूमी असणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यानंतरच मृतदेह दफन करण्याची परवानगी मिळेल, असेही या परिपत्रकानुसार महापालिकेने स्पष्ट केले. त्यामुळे या साथीच्या आजाराचा धोका लक्षात घेता महापालिकेने बडा कब्रस्थान येथे कोणत्याही कोरोनाग्रस्ताला दफन करण्यास परवानगी देवू नये, अशी विनंती केली आहे.

महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनाग्रस्त मृत व्यक्तीला यापुढे दफन न करता त्या मृतदेहाला जाळले जाईल. परंतु याला मुस्लिम समाजातील नेत्यांनी विरोध केल्यानंतर परिस्थितीनुसार निर्णय घेतला जावा, अशी सुधारणा करण्यात आली आहे. मात्र बडा कब्रस्थान येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह दफन केला गेला असला तरी मालाड येथील दफनभूमीत अशा रुग्णाच्या मृतदेहाला दफन करण्यास दफनभूमीच्या विश्वस्तांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे मालाडमधील कोरोनाग्रस्त मुस्लिम व्यक्तीचा मृतदेहावर बोरीवली दौलत नगर येथील विद्युत दाहिनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.


मुंबईतलं मोठं रुग्णालय सील; ३ डॉक्टर, २६ नर्सेसना कोरोनाची लागण!