पूरग्रस्तांना मदत न करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांना मनसेचा धोबीपछाड

महाराष्ट्राला कर्मभूमी सांगणाऱ्या बॉलिवूड कलाकारांनी पूरग्रस्तांना मदत का केली नाही? असा प्रश्न मनसेने बॉलिवूड कलाकारांना विचारला आहे.

Mumbai
mns slams on Bollywood actors who did not help sangali and kolhapur flood affected peoples
पूरग्रस्तांना मदत न करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांना मनसेचा धोबीपछाड

पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांवर महापुराचे मोठे संकट आले. या पुरामध्ये हजारो लोकांचे संसार उघड्यावर पडले. तिकडची परिस्थिती अजूनही भीषण आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने मदतीचा हात पुढे केला. एनडीआरएफचे जवान, सर्वसामान्य माणूस, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि अनेक स्वयंसेवक तरुण पुरात अडकलेल्यांना अन्न-धान्यापासून सर्वच बाबतीत मदत करत आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी कलाकारही मागे हटले नाहीत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी कलाकारांनी नियोजनपूर्वक मदतसामुग्री पोचवण्याची व्यवस्था केली. मात्र, महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे, असे मुलाखतींमधून जे सांगतात ते बॉलिवूड कलाकार या संकंट काळात कुठे होते? असा प्रश्न मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी बॉलिवूड कलाकारांना विचारला आहे.

हेही वाचा – मनसेकडून महापौरांना ‘शिवछत्रपतींची स्त्री – नीती’ हे पुस्तक भेट

‘लानत है उनपर, जिनके पास दानत नहीं है…’

मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर या संदर्भात ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटमध्ये बॉलिवूड कलाकारांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील मराठी कलाकारांचे कौतुकही मनसेने केले आहे. मनसेने आपल्या ट्विटमध्ये बॉलिवूड कलाकारांना खडेबोल सुनावले आहे. ट्विटमध्ये मनसे म्हणाले आहे की, ‘कुणी काय करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे म्हणतात. पण इथे प्रश्न गंभीर आहे. स्वत:ची मसीहा अशी प्रतिमा पडद्यावर रंगवणाऱ्या या स्टार्सना नेमका स्वत:च्या कर्मभूमीचा कसा विसर पडतो? हाच प्रश्न सतावतोय आणि संतापही येतोय.’

बॉलिवूड सुपरस्टार अमिर खान यांचे महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशनच्या मार्फत जोरदार समाजकार्य काम सुरु आहे. शाहरुख, सलमान आणि अक्षय कुमार देखील वेळोवेळी समाजकार्य करत आले आहेत. मात्र, महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यापैकी एकही बॉलिवूड कलाकार पुढे आलेला नाही.

मनसेची जोरदार टीका

ज्या प्रेक्षकांच्या जीवावर तुंबड्या भरतात तेच प्रेक्षक जेव्हा दु:खात आहेत तेव्हा त्यांना सावरण्यासाठी बॉलिवूड कलाकार पुढे का आले नाहीत? असा प्रश्न मनसेने विचारला. त्याचबरोबर एकमेकांचे टुकार चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी उठसूठ व्हिडिओ बाईट पोस्ट करणारे हिरो, यांना मदतीचे आवाहन करणारा एक साधा व्हिडिओही टाकता आला नाही? असाही प्रश्न मनसेने विचारला.