लोकल सेवा सुरू करा, अन्यथा सविनय कायदेभंग

मनसेचा राज्य सरकारला अल्टीमेटम

MNS sandeep deshpande

बेस्ट बसच्या गर्दीत नाही, पण रेल्वेत कोरोना होतो का ? असा संतप्त सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. एक ट्विट करत त्यांनी राज्य सरकारला सविनय कायदेभंग करण्याचा इशारा दिला आहे.

 

बसच्या गर्दीत करोना होत नाही पण रेल्वे च्या गर्दीत होतो असा सरकारचा समज आहे का?? रेल्वे सेवा सुरू करा अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल..!

Posted by Sandeep Deshpande Adhikrut on Wednesday, September 16, 2020

 

बेस्ट बसमध्ये रोजचा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असताना लोकल सेवा सुरू होत नसल्यानेच त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेत सरकारला जाब विचारला आहे. दररोज एसटी आणि बेस्ट बसेससाठी लागणाऱ्या लोकांच्या लांबच लांब रांगा यामुळे मुंबईत येणाऱ्या तसेच मुंबईतून उपनगर आणि नजीकच्या परिसरात जाणाऱ्या प्रवाशांचे रोजचे हाल होत आहेत. बेस्ट बस एकीकडे खचाखच भरून धावत आहे. दुसरीकडे लोकल मात्र सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद आहेत. अशावेळी लोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकारला मनसेने अल्टीमेटम दिला आहे.

मुंबई पूर्व आणि पश्चिम उपगनगरातून तसेच एमएमआर क्षेत्रातून मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या चाकरमान्यांचे रोजचे अतोनात हाल होत आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल सेवा सुरू आहे. पण त्याठिकाणीही गर्दी वाढत असल्याने आता लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकडूनही करण्यात येत आहे. दुसरीकडे सर्वसामान्य प्रवाशांना रोजच्या कामाच्या निमित्ताने तसेच व्यवसायाच्या निमित्ताने लोकलमध्ये प्रवेश मिळत नसल्याने अनेक हाल सहन करत प्रवास करण्याची वेळ येत आहे.

अनेक तास रांगेत उभे राहिल्यानंतर पुन्हा लोकल ट्रेनमध्ये उभे राहण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. त्यामध्येच बसची फ्रिक्वेन्सी पुरेशी नसल्याने बसमध्येही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. एसटीच्या फेऱ्यादेखील अतिशय तोकड्या आहेत. तर बेस्ट बसेसचे संपुर्ण वेळापत्रक कोलमडल्यानेच आता मनसेने सर्वसामान्यांच्या आवाजाला प्रतिसाद देत सरकारला अल्टीमेटम दिला आहे. जर लोकल सेवा लवकर सुरू झाली नाही तर सविनय कायदेभंग करावा लागेल असा ईशारा मनसेकडून देण्यात आला आहे.