घरमुंबईमेट्रो कारशेड विरोधात आता राजकीय फटकेबाजी

मेट्रो कारशेड विरोधात आता राजकीय फटकेबाजी

Subscribe

काँग्रेस करणार वृक्षपूजन तर मनसेचे आझाद मैदानात आंदोलन

गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या आरे येथील मेट्रोच्या कारशेडवरुन आता लवकरच राजकीय आतिषबाजी होण्याची चिन्हे आहेत.यावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये मतांतर निर्माण झाल्यानंतर आता लवकरच यावरुन राजकीय रणाकंदन उठण्याची चिन्हे आहेत. मेट्रो कारशेडविरोधात काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरणार आहेत. मेट्रो कारशेडसाठी झालेल्या वृक्षतोडीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी काँग्रेसकडून गोरेगाव येथे वृक्षपूजन करुन आंदोलन करण्यात येणार असून दुसरीकडे मनसेकडून आझाद मैदानात विविध संघटनांच्या मदतीने आरे वाचवा मोहीम राबविण्यात येणार आहे.

मेट्रोचे कारशेड आरे येथे व्हावे यासाठी मुंबई महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वीच २७०० वृक्ष तोडण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. या निर्णयानंतर सामान्य नागरिकांबरोबर अनेकांनी त्याविरोधात आवाज उठविला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा चांगलाचा गाजला आहे. या निर्णयावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये देखील दोन गट पडल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आता या निर्णयाला राजकीय वळण प्राप्त झाले असून या निर्णयाविरोधात विरोधकांनी ही सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. या निर्णयाचा विरोध करण्यासाठी रविवारी आता काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही राजकीय पक्ष मैदानात उतरले आहे. काँग्रेसकडून आरे वाचवण्यासाठी व ’मेट्रो कारशेड हटाव’ या मागणीकरिता ’वृक्षपूजनाचा कार्यक्रम’ आयोजित करण्यात आलेला आहे.

- Advertisement -

हा कार्यक्रम रविवार दि. १५ सप्टेंबर २०१९ दुपारी १२ वाजता क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक, पिकनिक पॉईंट आरे, गोरेगाव (पूर्व), मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला असून, या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते शेखर सुमन, भवन्स महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रविश पंड्या, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम उपस्थित राहणार आहेत. आरेमध्ये असलेल्या तमाम आदिवासी पाड्यांतील आदिवासी नागरिक, सेव्ह आरे या संस्थेचे सभासद व या विभागात राहणारे मुंबईकर नागरिक मोठ्या संख्येने या ’वृक्षपूजनाच्या कार्यक्रमा’ मध्ये सहभागी होणार आहेत आणि प्रस्तावित मेट्रो कारशेड साठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा तीव्रपणे विरोध करणार आहेत.

तर दुसरीकडे या निर्णयाचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी देखील विरोध केला होता. त्यानंतर आता रविवारी मनसेकडून या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आझाद मैदानात आरे वाचवा मोहीम सुरु करण्यात येणार आहे. या मोहीमेत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राजकीय विश्लेषकांचे देखील या मोहीमेकडे लक्ष लागून राहिले आहे. अमित ठाकरे यावेळी कोणती भूमिका मांडतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -