घरमुंबई'मोनाडार्लिंग' झाली 'नकुशी', एमआरव्हीसीला एमएमआरडीच्या पायघड्या

‘मोनाडार्लिंग’ झाली ‘नकुशी’, एमआरव्हीसीला एमएमआरडीच्या पायघड्या

Subscribe

देशातील पहिली मोनो रेल चालवण्यासाठी ऑपरेटर मिळेनासा झाला आहे. ‘नकुशी’ झालेली मुंबईतील मोनो रेल्वे चालवण्यासाठी अखेर मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनने रडतखडत का होईना पण रस दाखवला आहे. चेंबुर ते महालक्ष्मी या टप्प्यात मोनो रेल्वे चालवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) गेल्या अनेक महिन्यांपासून ऑपरेटरच्या शोधात आहेत. जानेवारी महिन्यापासून सलग चौथ्यांदा निविदा प्रक्रिया राबवण्याची वेळ एमएमआरडीएवर आली आहे.

एमएमआरडीएने वळवला एमआरव्हीसीकडे मोर्चा

- Advertisement -

एमएमआरडीएने मोनो रेल्वे बाबतचा तपशील हा मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी)कडे पाठवला आहे. पण एमआरवीसीसोबतची चर्चा ही खुपच प्राथमिक टप्प्यात असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. ऑपरेटरकडे येणाऱ्या जबाबदारीत ऑपरेटींग आणि मेन्टेनन्सच्या कामाचा समावेशही यामध्ये असेल. एमएमआरडीएने एमआरव्हीसी आणि दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) कडे मोनो रेल्वे चालवण्यासाठी बोलणी सुरू केली होती. पण डीएमआरसीने यासाठी कोणताही प्रतिसाद दाखवला नाही. डीएमआरसीने कानाडोळा केल्यानेच आता एमएमआरडीएने मोर्चा एमआरवीसीकडे वळवला आहे. आम्ही एमआरव्हीसीला मोनोरेल्वेशी संबंधित प्राथमिक माहिती दिली आहे, असे एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त संजय खंदारे यांनी सांगितले आहे.

मोनो रेल्वे आमने सामने (प्रातिनिधीक चित्र)

मोनो रेल्वेमुळे झालेले नुकसान

- Advertisement -

देशातील पहिली मोनो रेल्वे ही २०१४ मध्ये सुरू झाली. मात्र गेल्या काही वर्षात सातत्याने मोनो रेल्वे वेगवेगळ्या तांत्रिक अडचणीत अडकली आहे. सगळ्यात मोठी घटना म्हणजे नोव्हेंबर महिन्यात पहाटेच्या वेळात मोनो रेल्वेचे जळालेले कोच. त्यानंतर सहा महिने उलटूनही मोनो रेल्वे चालवण्यासाठी कोणत्याही कंपनीने पुढाकार घेतला नाही. दुसऱ्या टप्प्यातील मोनो रेल्वेचा महालक्ष्मीपर्यंतचा टप्पा पुर्ण न केल्याने कंत्राटदारालाही दंड ठोठावण्यात आला आहे. ट्रेन कोचचा तुटवडा आणि स्पेअर पार्टची उपलब्धतता नसल्यानेच हे दुसऱ्या टप्प्यातील काम रखडल्याचे समजते. जानेवारी महिन्यापासून मोनो रेल्वेसाठी ऑपरेटर शोधण्यासाठी हा चौथा प्रयत्न आहे. दुसऱ्या टप्प्यातील काम पुर्ण न केल्यासाठी दिवसामागे साडे सात लाख रूपयांचा दंड कंत्राटदाराला ठोठावण्यात आला आहे.

टाईमलाईन

  • २००८ – मोनो रेलच्या कामासाठी स्कॉमी इंजिनिअरींग या मलेशियन कंपनीची नियुक्ती
  • २०११ – मोनो रेल्वे प्रकल्पाच काम पुर्ण
  • २०१४- पहिल्या टप्प्यात चेंबुर – वडाळा दरम्यान मोनो रेल्वे धावली
  • २०१५ – प्रकल्पातील अनियमिततेसाठी कॅगचे ताशेरे
  • २०१६ – टायर, दरवाजा यासारख्या तांत्रिक अडचणींची पुनरावृत्ती
  • जुलै २०१७ – वीज पुरवठ्यातील तांत्रिक अडचणीमुळे मोनो ठप्प
  • नोव्हेंबर २०१७ – मोनो रेल्वेच्या कोचला आग
  • एप्रिल २०१८ – वडाळा – जेकब सर्कल दरम्यानच्या टप्प्याला सेफ्टी क्लिअरन्स
Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -