वाढीव वीज बिलाविरोधात भाजप महिला आघाडीचा मोर्चा

bjp

राज्यात वाढीव बिलावरुन राजकारण तापले असून भाजप महिला आघाडीने मुंबईतील महावितरणाचे मुख्यालय प्रकाशगडावर मोर्चा काढला आहे. पोलिसांकडून मोर्चा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मोर्चाच्यावेळी ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. आंदोलकांनी गेटवर चढत आत घुसण्याचा प्रयत्न केला. मोर्च्यात चित्रा वाघ, भाजपचे आमदार अतुल भातखळकर उपस्थित होते.

अतुल भातखळकर यांनी यावेळी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकारला बेशरम ठाकरे सरकार म्हटले. दम असेल तर मुंबईकारांचे वीज कनेक्शन कापून दाखवा, असे आव्हान अतल भातखळकर यांनी दिले आहे. हे सरकार खोटे बोलणारे सरकार आहे. महामारी सुरु झाल्यानंतर या सरकारने शाळा शुल्क कमी करणार, वीज बिलात सवलत देणार अशी आश्वासने दिली. मात्र, या घोषणा केवळ घोषणाच राहिल्या. यावर जेव्हा भाजप त्यांना प्रश्न विचारते तेव्हा हे सरकार निधी नसल्याचे सांगते. पण, कंगना राणावतचे घर तोडल्यानंतर विशेष वकिलासाठी १ कोटी रुपये देतात. अर्णब गोस्वामीविरोधात केस लढवण्यासाठी कपिल सिब्बल यांना दिवसाला १० लाख रुपये द्यायला या सरकारकडे पैसे आहेत. नितीन राऊत यांनी लाखो रुपये खर्च करुन स्वत:च्या केबिनचे नूतनीकरण केले आहे. दोन मंत्र्यांनी महामारीच्या काळात ५०-५० लाखांच्या गाड्या घेतल्या. यासाठी यांच्याकडे पैसे आहेत. हे सरकार खोटारडे आहे, असा हल्लाबोल अतुल भातखळकर यांना केला.