घरताज्या घडामोडीमुंबईकरांसाठी गुड न्यूज, संसर्गमुक्तीकडे वाटचाल

मुंबईकरांसाठी गुड न्यूज, संसर्गमुक्तीकडे वाटचाल

Subscribe

शहरातील झोपडपट्टयांमध्ये सुमारे ५७ टक्के आणि बिगरझोपडपट्टी भागांत सुमारे १६ टक्के रहिवाशी संसर्गमुक्त होऊन त्यांच्या शरीरात प्रतिपिंडे तयार झाल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणाने नोंदवला आहे.

गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाशी लढत असलेल्या मुंबईचा प्रवास समूह प्रतिकारशक्तीच्या दिशेने सुरू असल्याचे चित्र सेरो सर्वेक्षणातून पुढे आले आहे. शहरातील झोपडपट्टयांमध्ये सुमारे ५७ टक्के आणि बिगरझोपडपट्टी भागांत सुमारे १६ टक्के रहिवाशी संसर्गमुक्त होऊन त्यांच्या शरीरात प्रतिपिंडे तयार झाल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणाने नोंदवला आहे. त्यामुळे टाळेबंदी शिथिल करण्यास ही अनुकूल परिस्थिती असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

निती आयोग, मुंबई महानगरपालिका, टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर) यांच्या वतीने आर उत्तर (दहिसर), एम पश्चिम (चेंबूर) आणि एफ उत्तर (माटुंगा) या भागांत जुलैच्या पहिल्या पंधरवडय़ात यादृच्छिक (रॅन्डमली) पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी तीन विभागांतील ६ हजार ९३६ जणांचे रक्ताचे नमुने संकलित करण्यात आले. त्यात झोपडपट्टीतील निर्धारित लक्ष्यापैकी अधिक तर बिगरझोपडपट्टी भागांतील ७० टक्के रहिवाशी सहभागी झाले होते. त्यातील झोपडपट्टीतील ५७ टक्के तर बिगरझोपडपट्टी भागांतील १६ टक्के रहिवाशांमध्ये प्रतिपिंडे तयार झाल्याचे आढळले. म्हणजेच इतके रहिवाशी करोनामुक्त झाले असून, यांच्यातील बहुतांश जणांना कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत, तर काही जणांना सौम्य लक्षणे होती. त्यात विशेषत: महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे त्यात नोंदविण्यात आले आहे.

- Advertisement -

पालिकेच्या नोंदीनुसार, या भागांतील निदान झालेल्या रुग्णांमधील मृत्यूदर सुमारे पाच ते सहा टक्के तर निदान न झालेल्या रुग्णांमधील मृत्यूदर हा कमी म्हणजेच ०.०५ ते ०.१० टक्के आहे. झोपडपट्टीत लोकसंख्येची घनता आणि सामूहिक शौचालय, पाणी भरण्याची ठिकाणे आदींमुळे संसर्गाचा फैलाव अधिक झाल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक उपायांमुळे संसर्ग रोखणे शक्य असल्याचे या सर्वेक्षणातून अधोरेखित झाले आहे. त्यामुळे एकाच विभागातील बिगरझोपडपट्टी भागातील संसर्गाचे प्रमाण कमी-अधिक प्रमाणात आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णांना कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. यावरून या आजाराबाबतची समाजात असलेली भिती कमी होण्यात मदत होऊ शकेल, असे मत डॉ. संदीप जुनेजा यांनी व्यक्त केले. सामूहिक प्रतिकारशक्तीच्या (हर्ड इम्युनिटी) अभ्यासासाठी हा अहवाल महत्त्वाचा असून झोपडपट्टीमध्ये ती लवकरच तयार होईल, असे यातून दिसून येते.

राज्यात ७,७१७ रुग्ण

- Advertisement -

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाले. गेल्या २४ तासांत ७,७१७ नवे रुग्ण आढळले. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवलीमधील रुग्णसंख्याही घटली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रुग्णांची संख्या अद्याप कमी झालेली नाही. पुणे (११८२), पिंपरी-चिंचवड (६७३) रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ लाख ९१ हजारांपेक्षा जास्त झाली.

७६ टक्के रुग्ण करोनामुक्त

मे आणि जून महिन्यांत करोनाचा संसर्ग वा0ढलेला असताना एकूण चाचण्यांच्या तुलनेत ४० ते ५० टक्के लोक बाधित झाल्याचे आढळून येत होते. सध्या मुंबईतील एकूण बाधितांचा आकडा १ लाख १० हजार ८४६ असून त्यापैकी ७६ टक्के म्हणजेच ८४,४११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत चार लाख ९४ हजार चाचण्या झाल्या. २२.२८ टक्के लोक बाधित आहेत.

टाळेबंदीमुळे बिगरझोपडपट्टी भागांतील रहिवाशांचा वावर कमी होता. तसेच संसर्ग प्रतिबंधात्मक उपायांचे पालन केले जात असल्याने तिथे संसर्गाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. परंतु, आता इथेही संसर्ग वाढत असल्याने चाचणी, विलगीकरण, ज्येष्ठांच्या चाचण्या अशा विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे. त्यासाठी या अभ्यासातील निष्कर्ष नक्कीच उपयुक्त ठरतील. – सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, पालिका

झोपडपट्टीत ५० टक्क्यांहूनही अधिकजण करोनामुक्त झाले आहेत. हा अभ्यास शहरातील तीन विभागांतील असला तरी संपूर्ण शहरातील चित्र कमी -अधिक प्रमाणात सारखेच असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मुखपट्टीचा वापर, अंतरनियम आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून शहरातील टाळेबंदी हळूहळू आणि काळजीपूर्वक शिथिल करता येऊ शकेल. -डॉ. संदीप जुनेजा, संगणक विज्ञान- तंत्रज्ञान विभाग, टीआयएफआर


हेही वाचा – मुंबईत समूह संसर्ग ओळखण्यासाठी आता ‘सेरो सर्वेक्षण’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -