घरमुंबईकल्याण लोकसभेसाठी राष्ट्रवादीची फिल्डींग; खासदार शिंदेंची वाट बिकट?

कल्याण लोकसभेसाठी राष्ट्रवादीची फिल्डींग; खासदार शिंदेंची वाट बिकट?

Subscribe

शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे कल्याणचे खासदार आहेत. त्यामुळे ठाणे-पालघर जिल्ह्यातील चार लोकसभा जागांपैकी असलेली कल्याण लोकसभा ही राजकीयदृष्ठ्या अधिकच महत्त्वाची मानली जाते. कल्याण लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना – भाजप यांच्या युतीवरून दोन्ही नेत्यांकडून चांगलीच ताणाताणी सुरू असली तरी युती होईल की नाही याबाबत अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. मात्र, कल्याणमध्ये शिवसेना भाजप स्वतंत्रपणे लढल्यास शिवसेनेसाठी ही निवडणूक कठीण होणार आहे, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनोमिलनाची चर्चा आहे. त्यांचेही मनोमिलन झाल्यास डॉ. श्रीकांत शिंदेंची लोकसभेची वाट बिकट होऊ शकते.

कल्याण लोकसभा हा राजकीयदृष्ठ्या सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ म्हणूनच ओळखला जातो. या मतदारसंघात डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मुंब्रा-कळवा या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. ठाणे, कल्याण आणि उल्हासनगर महापालिका तसेच अंबरनाथ नगरपालिका यांचा भाग येतो. उल्हासनगर वगळता उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थेत युतीची सत्ता आहे.

- Advertisement -

कल्याण लोकसभा मतदारसंघ नव्याने झाल्यानंतर २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे आनंद परांजपे हे विजयी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे वंसत डावखरे यांचा केवळ २४ हजार मतांनी पराभव झाला होता, तर मनसेने तब्बल १ लाख मते घेतली होती. त्यामुळे शिवसेनेचा निसटता विजय झाला होता. २०१४ च्या निवडणुकीत राजकारणात खूपच घडामोडी झाल्या. शिवसेनेचे तत्कालीन खासदार आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का मानला जात होता. परांजपे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शिवसेनेकडे उमेदवार नव्हता. अखेर शिवसेनेने हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा करत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांना निवडणूक रिंगणात उतरवले. राजकारणाचा कोणताही गंध नसताना श्रीकांत शिंदे निवडणुकीच्या बोहल्यावर चढले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आनंद परांजपे, शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे आणि मनसेकडून प्रमोद उर्फ राजू पाटील अशी लढत झाली. मात्र, २०१४ च्या मोदी लाटेने अनेकांना तारलं. शिवसेनेचे श्रीकांत शिंदेही विजयी झाले. मोदी लाटेत शिंदे यांना तब्बल २ लाखांहून अधिक मते मिळाली होती. मात्र, मोदी लाट असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसची २ हजार मते वाढली होती, तर मनसेची २२ हजार मते घटली होती.

मागील निवडणुकीत मोदी लाटेचा अनेकांना फायदा झाला असला तरीसुद्धा आता मोदी लाट ओसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राजकारणाची हवा बदलली आहे. याचाच फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने उठवायचा ठरवले असून, खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. या महिन्यात शरद पवार कल्याण-डोंबिवलीच्या दौर्‍यावर येत आहेत. तसेच शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील जवळीक वाढल्याने मनसे-राष्ट्रवादी युतीची चर्चाही रंगली आहे. दोघेही एकत्र आल्यास शिवसेनेला ही निवडणूक जड जाणार आहे. युती न झाल्यास भाजपलाही उमेदवार उभा करावा लागणार आहे. त्यामुळे युतीच्या मतांची विभागणी होऊ शकते. शिवाय कल्याण लोकसभेत राजकारणाची काय गणिते असतील हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे.

- Advertisement -

युती आघाडी न झाल्यास संभाव्य उमेदवार

शिवसेना – डॉ. श्रीकांत शिंदे
भाजप – रवींद्र चव्हाण, रमेश पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस – गणेश नाईक, बाबाजी पाटील, प्रमोद हिंदुराव
काँग्रेस – संतोष केणे, संजय दत्त, नवीन सिंग

२०१४ चा निकाल
डॉ. श्रीकांत शिंदे (शिवसेना) – ४ लाख ४० हजार ८९२
आनंद परांजपे (राष्ट्रवादी काँग्रेस) – १ लाख ९० हजार १४३
राजू पाटील (मनसे) – १ लाख २२ हजार ३४९

२००९ चा निकाल
आनंद परांजपे (शिवसेना) – २ लाख १२ हजार ४७६
वसंत डावखरे (राष्ट्रवादी काँग्रेस) – १ लाख ८८ हजार २७४
वैशाली दरेकर (मनसे) – १ लाख २ हजार ६३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -