मराठा आरक्षण आणि कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षांच्या सुधारित तारखा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहीर केल्या आहेत. राज्य सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा मार्च महिन्यात घेण्यात येईल. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा एप्रिलमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
राज्य सेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर २०२० रोजी आयोजित करण्यात आली होती. परंतु राज्य सरकारने ऐनवेळी ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यासोबतच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले होते. मात्र आता आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा १४ मार्चला घेण्याचे जाहीर केले आहे. तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २७ मार्चला तसेच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा ११ एप्रिलला होणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन एमपीएससीने केले आहे.