वीजबिल मागायला याल तर खबरदार, तयार आहे आमचे तेल लावलेले पायताण

कोरोना काळातील वीज बिल मागणाऱ्या सरकारला… वीज कट करणाऱ्याला… जनतेवर जबरदस्ती करणाऱ्याला.. खणखणीत झटका.. अस्सल कोल्हापूरी… तेल लावलेले पायताण. असे कॅम्पेन सध्या वीज बिल भरणार कृती समिती, कोल्हापूर मार्फत सुरूय. मिरजकर तिकटी येथे उभारण्यात आलेला कृती समितीचा हा फलक आता तुफान व्हायरल झाला आहे. कोरोनाच्या काळात वाढीव वीजबिले फुगल्यानंतर आता महावितरणने वीजबिल भरण्याचा तगादा लावला आहे. त्यामुळेच आता अस्सल कोल्हापुरी भाषेतच या फलकाच्या माध्यमातून वीजबिल मागणाऱ्या महावितरण कंपनीचा समाचार घेण्यात आला आहे.

वीज बिल भरणार नाही, कृती समितीकडून संपर्कासाठी मोबाईल क्रमांकही देण्यात आले आहेत. वीज बिल वसुलीला आला की या क्रमाकांवर फोन करा असे आवाहन कृती समितीकडून करण्यात आले आहे. कोरोना काळातल्या फुगवून देण्यात आलेल्या वीज बिलांमध्ये सवलत न दिल्याचा रोष हा वीज ग्राहकांमध्ये आहे. त्यामध्येच या कृती समितीच्या माध्यमातून वीज ग्राहकांच्या फुगलेल्या वीजबिलांच्या समस्येला जागा करून देण्यात आली आहे. त्यामुळेच आता या पोस्टरबाजीचे वॉट्स एप तुफान असे व्हायरल झाले आहे. कोल्हापूरसारखे आवाहन मुंबईतही मनसेने केले आहे. मनसेने केलेल्या आवाहनात वीजबिलाचा जाब विचारण्यासाठी एक्शन प्लॅन सोमवारी जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामध्ये वीज ग्राहकांना सोमवारच्या आंदोलनात सामील होण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.