एमएसआरडीसीला लॅण्ड पार्सलमधून मिळणार १५ हजार कोटी रूपये

मुंबई पुणे एक्सप्रेस वे लगतच्या जागाही लिलाव प्रक्रियेत

MSRDC plot

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फतच्या मोक्याच्या जागा येत्या दिवसांमध्ये दीर्घ मुदतीच्या भाडेकरारावर उपलब्ध होणार आहेत. या जागांच्या लिलाव प्रक्रियांमधून साधारणपणे १५ हजार कोटी रूपये मिळतील असा अंदाज एमएसआरडीसीने व्यक्त केला आहे. या जागांच्या लिलाव प्रक्रियेसाठी जेएलएल या आंतरराष्ट्रीय सल्लागार एजन्सीची नेमणुक एमएसआरडीसीने केली आहे. दक्षिण मुंबई तसेच मुंबई पुणे एक्सप्रेस लगतच्या काही जागांचा यामध्ये समावेश आहे.

एमएसआरडीसीच्या या प्लॉटच्या जागेच्या लिलाव प्रक्रियेतून आम्ही जवळपास १५ हजार कोटी रूपये अपेक्षित करत आहोत, असे एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी स्पष्ट केले. नेपेन्सी रोड येथील जागेसाठी गेल्या वर्षी निविदा प्रक्रिया सुरू झाली होती. पण रिअल इस्टेट मार्केटमध्ये आलेल्या मंदीमुळे ही प्रक्रिया लांबली आहे. या जागांचा लिलाव प्रक्रियेनंतरचा दीर्घमुदतीच्या भाडेतत्वावर देण्याचा कालावधी हा साधारणपणे ३० ते ६० वर्षे इतका असू शकतो. वांद्रे येथेही कास्टिंग यार्डचा एक प्लॉट आहे. त्यामुळे हा प्लॉटदेखील येत्या काळात लिलाव प्रक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकतो. येत्या दिवसांमध्ये महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतरच या प्लॉटसाठीची निविदा प्रक्रिया सुरू होईल असे मोपलवार यांनी सांगितले.

नेपेन्सी रोडच्या प्लॉटसोबतच मुंबई पुणे एक्सप्रेस वे लगतच्या काही जागांच्या माध्यमातून एमएसआरडीसीला ही रक्कम मिळणे अपेक्षित आहे. तसेच वांद्रे येथील कास्टिंग यार्डचा प्लॉटदेखील येत्या दिवसांमध्ये लिलावाच्या प्रक्रियेसाठी उपलब्ध होईल. या मिळणाऱ्या रकमेचा वापर हा एमएसआरडीसीच्या विविध प्रकल्पांसाठी होणार आहे. दक्षिण मुंबईत नेपेन्सी रोड याठिकाणी एकुण १.५४ एकरचा (६७ हजार चौरस फुट)भूखंड आहे. या जागेतून जवळपास ७०० कोटी रूपयांपेक्षा अधिक रक्कम मिळणे अपेक्षित आहे. या भूखंडाच्या बोलीसाठी लागणाऱ्या रकमेचा वापर हा मुंबई नागपुर समृद्धी महामार्गासाठी होणार आहे.