एसटीच्या ताफ्यात 20 नव्या रातराणी दाखल

एसटी महामंडळाने खरेदी केलेल्या नव्या रातराणीच्या 200 चेसीसपैकी 20 गाड्या बांधून एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत या गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील, अशी माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिली आहे.

मुंबईहून सुटणार्‍या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या नव्या रातराणींचा समावेश आहे. तूर्तास धावणार्‍या रातराणी या केवळ आसन सेवा पुरवतात. मात्र त्यामुळे प्रवाशांची बरीच दगदग होते. याउलट एसी गाड्यांचे तिकीट अधिक असल्याने प्रवाशी खासगी सेवेकडे वळताना दिसतात. या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे आकर्षित करण्यासाठी नॉन एसी मात्र सीटर व स्लीपर अशी दुहेरी सुविधा पुरवणार्‍या नव्या रातराणी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकारात 200 चेसीस महामंडळाने खरेदी केल्या आहेत. त्यातील 20 गाड्या बांधून तयार झाल्याने मुंबईत दाखल झाल्या असून त्यांचे मार्ग आणि तिकिटदर निश्चित झाल्यानंतर डिसेंबर अखेरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील.मुंबीतून पारगड, पाटगाव, बुलढाणा, सांगली, अंमळनेर या मार्गांवर नव्या रातराणी चालवण्याची शक्यता आहे.

तसेच या मार्गांवर धावणार्‍या रातराणींच्या जागी टप्प्याटप्प्याने या गाड्या चालवल्या जातील. एसी नसल्याने तिकीट दर कमी ठेवण्यात येतील. सध्या महामंडळाच्या निमआराम बस प्रमाणेच या नव्या रातराणीचे तिकीट असेल, अशी शक्यता व्यक्त करताना प्रवाशांचा या सेवेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी माहिती एसटी महामंडळातील एका वरिष्ठ अधिकार्‍यांने दिली आहेे.

1 पारगड (कोल्हापूर) – परेल
2 पाटगाव (कोल्हापूर) -परेल
3 चिखली (बुलढाणा ) – मुंबई सेंट्रल
4 सांगली – मुंबई सेंट्रल
5 अमळनेर (जळगाव) – मुंबई सेंट्रल