मुंबईत होणार मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब

एकाच ठिकाणी विविध प्रवासाच्या सुविधा

Mumbai

मुंबईतील वाहतुक उपक्रमांचा मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब उभारणीसाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. बेस्ट उपक्रमाने या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला जागा देण्यासाठी तयारी दर्शविली आहे. विविध वाहतुकीच्या पर्यायांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रकल्प असे मल्टीमोडल हबचे वैशिष्टय आहे.

बेस्टच्या वडाळा आगार येथील जागेवर मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब उभारणीसाठीचा प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतला होता. पण बेस्टकडून जागा देण्यासाठी सुरूवातीला विरोध होता. अखेर या प्रकल्पासाठी मन वळविण्यात एमएमआरडीएला यश आले आहे. या प्रकल्पासाठी आता ेएमएमआरडीएने सल्लागार नेमणूकीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. बेस्टच्या वडाळा डेपोच्या १६ हेक्टर जागेवर मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यासाठी जागा लागणार आहे. वाहतूक क्षेत्रातील मेट्रो स्टेशन, मेट्रो कारशेड, आंतरशहरीय बस टर्मिनल, बेस्ट बसेस, नवी मुंबईतील हार्बर मार्गासाठी कनेक्टिव्हिटी अशा अनेक उपक्रमासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे.

या संपुर्ण प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक उपयोगिता तपासण्यासाठी सल्लागार नेमणूकीसाठीची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे अशी माहिती एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे यांनी दिली. या संपुर्ण प्रकल्पासाठी लागणारी आर्थिक गरज लक्षात घेता अद्याप तरी कोणता उपक्रम किती योगदान देणार याबाबतची कोणताही निर्णय झालेला नाही असे त्यांनी सांगितले. सल्लागारांच्या मदतीने या प्रकल्पात मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब उभारणीसाठीचा आराखडा तयार करण्यात येईल. त्यानंतरच कामासाठीच वेगळी निविदा एमएमआरडीएकडून देण्यात येईल असे ते म्हणाले. ट्रान्सपोर्ट हबमुळे एकाचवेळी अनेक वाहतुकीच्या पर्यायांचा वापर करणे प्रवाशांना शक्य होईल.

एमएमआरडीएने वडाळ्यातील काही भाग विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एमएमआरडीएच्या अखत्यारीतील भागात हा विकास करण्यात येणार आहे. त्यामध्ये शाळा, हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. तसेच काही कमर्शियल प्लॉटवरही विकास करण्यात येणार आहे. सध्याच्या मोनोरेलच्या कारशेडच्या काही जागेचा वापरही यासाठी करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here