घरमुंबईमुलुंडची अंग टाकायला सुरुवात

मुलुंडची अंग टाकायला सुरुवात

Subscribe

सहायक आयुक्त क्वारंटाईन, वैद्यकीय अधिकारी आजारी, रुग्णवाहिकांमुळे मुलुंडकर हैराण

मुंबईचा सर्वात कमी करोनाबाधित रुग्ण आणि सुरक्षित विभाग म्हणून ज्या मुलुंड विधानसभा अर्थात महापालिकेच्या टी विभागाकडे पाहिले जात होते. तो विभाग आता हळूहळू करोना रुग्णांच्या यादीत वरच्या क्रमांकावर सरकत असल्याचे दिसत आहे. अगदी रडत रडत सत्तरीपर्यंत पोहोचणार्‍या या विभागाने एका महिन्यांतच ७२४ पर्यंतच मजल मारली आहे. सध्या टी विभागाचे सहायक आयुक्त, विभागाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी करोना तसेच अन्य आजाराने आजारी असल्याने हा विभागाने आता अंग टाकायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

मुलुंडमध्ये सुरुवातीला रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने प्रारंभी तेवढा परिणाम दिसून येत नव्हता. मात्र आता खर्‍या अर्थाने मुलुंडने रौद्ररुप धारण केले आहे. येथील रुग्णांची संख्या दररोज सरासरी ३० ते ४० ने वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्णांना दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका, आणि रुग्णालयात खाटा नसल्याने मुलुंडकरांना वेगळा अनुभव येत आहे. रुग्णाला दाखल करण्यासाठीच सहा ते सात तास रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी आणि रुग्णवाहिका आल्यानंतर रुग्णालयात खाटा नाही म्हणून मग रुग्णाला या नाहीतर त्या रुग्णालयात नाचवत बसा असाच प्रकार सुरु आहे. विशेष म्हणजे या मतदार संघात सर्व भाजपचेच नगरसेवक असून नगरसेवक असलेले मनोज कोटक हे खासदार आहेत. त्यामुळे सहा विधानसभा क्षेत्रामध्ये आपले लक्ष ठेवताना कोटक यांनी मुलुंडवरील आपले लक्ष कमी होवून दिले नाही.

- Advertisement -

मुलुंडमधील प्रत्येक नगरसेवक आणि प्रशासनातील अधिकारी यांना विश्वासात घेवून त्यांनी येथील रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. मुलुंडमध्ये पहिला अन्न वाटपाचा स्टॉल्स भाजपचे प्रकाश गंगाधरे यांनी लावून एकप्रकारे गरीब व गरजू, नाका कामगार आदींच्या जेवणाची व्यवस्था केली. त्यानंतर महापालिकेच्यावतीने तसेच खासदार कोटक यांच्यावतीने व आमदार मिहिर कोटेच्या याच्या प्रयत्नाने गर्दीचे नियंत्रण राखण्याचा प्रयत्न पोलिसांच्या मदतीने केला.

मुलुंडमध्ये सुरुवातीलपासून रुग्णवाढीचा दर तसा फारच कमी होता. परंतु २ मेपासून जी उसळी मारली तेव्हापासून मग रुग्ण वाढतच जात आहेत. तेव्हा ७१ रुग्ण होते. मात्र इंदिरा नगर, रामगड याठिकाणी एकदम ५२ रुग्ण आढळून आले. त्यामुळे रुग्णसंख्या एकदम १२३ वर पोहोचली. इंदिरा नगर, रामगड आणि अमर नगर आदी ठिकाणी स्पेशल मोहिम राबवून आरोग्य सेविकांच्या मदतीने सर्व्हे केला. यामध्ये सर्दी,खोकला व शरीराचे तापमान अधिक असलेल्यांना बाहेर काढून त्यांची चाचणी केली. त्यामुळे मग रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आज ७२४ एवढी बाधित रुग्णांची संख्या झाली आहे.यातील ३६० हून अधिक रुग्ण बरे होवून आले आहेत. तर आतापर्यंत ३०जणांचा मृत्यू झाला आहे. क्वारंटाईन तसेच कोविड आरेाग्य केंद्राची उपलब्धता आहे. आयसीयू बेड्सची थोडीफार कमरता आहे,असे टी विभागाचे सहायक आयुक्त किशोर गांधी यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

माझ्या प्रभागात रामगड, रोहिदास नगर येथे रुग्ण बरे होवून आले. एका वृध्दाश्रमात डॉक्टर,कर्मचारी तसेच वृध्द अशा २२ लोकांना करोनाची बाधा झाली होती. त्यातील ४ वृध्दांचे निधन झाले. मात्र, यासर्व वृध्दांसहित कर्मचार्‍यांना खासदार मनोज कोटक यांच्या प्रयत्नाने रुग्णालयात दाखल केले. या बरे झालेल्या वृध्दांना परत त्यांच्या घरी पाठवण्यात आले.
-समिता कांबळे, नगरसेविका, भाजप.

माझ्या प्रभागात अमरनगर हा प्रमुख हॉटस्पॉट असून आतापर्यंत ५० पेक्षा अधिक रुग्ण आढळले. त्यातील २० पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नाही हीच प्रमुख समस्या आहे. रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी किमान सहा ते सात तासांची प्रतीक्षा करावी लागते. त्यातही खाट मिळेल की नाही याची शाश्वती नाही.
-नील सोमय्या,नगरसेवक,भाजप.

इंदिरानगर १, २ व ३ याच भागात सर्वांधक रुग्ण आढळून आले होते. परंतु आता येथील बहुतांशी रुग्ण बरे होवून आले असून आता येथे एकही नवीन रुग्ण नाही. वेळेवर रुग्णवहिका उपलब्ध न होणे, रुग्णाला ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर्स वेळीच उपलब्ध न होणे ही प्रमुख समस्या आहे.
-प्रकाश गंगाधरे, नगरसेवक, भाजप.

झोपडपट्टी परिसर आणि इमारती अशाप्रकारे माझ्याकडे करोनाबाधित रुग्ण मिळण्याची मिश्र ठिकाणे आहेत. सामृग्रीची उपलब्धतेचा अभाव आहे. मिठागर शाळा आणि रिध्दीसिध्दी येथे दोन क्वारंटाईन सेंटर आहेत. परंतु तिथे डॉक्टर्सच नाही. सनग्रुपच्या ठिकाणी १२० खाटा तसेच जकात नाका येथे ११८ खाटांचे केअर सेंटरही डॉक्टरांअभावी सुरु झालेले नाही.
-प्रभाकर शिंदे, नगरसेवक, भाजप.

इतर आजाराने मृत्यमुखी पडणार्‍या रुग्णांना शवाहिनी मिळत नाही. महापालिकेला सांगूनही ती वेळीच उपलब्ध होत नाही. अशी परिस्थिती मुलुंडमध्ये आहे.
-रजनी केणी,नगरसेविका, भाजप.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -