घरमुंबई1 ऑक्टोबरपासून मुलुंड डम्पिंग बंद

1 ऑक्टोबरपासून मुलुंड डम्पिंग बंद

Subscribe

डम्पिंगच्या कचर्‍यापासून खत निर्मितीला सुरुवात

मुलुंड येथील डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. डम्पिंगवरील कचर्‍यापासून खत निर्मिती केली जाणार आहे. त्याची अंमलबजावणी येत्या 1 ऑक्टोबरपासून केली जाणार आहे. मुलुंड डम्पिंगवरील कचर्‍याची वाहतूक करण्यासाठी 6 वर्षांचे कंत्राट देण्यात आले असून यासाठी पालिका 731 कोटी रुपये खर्च करणार आहे. या डम्पिंगवर जमा होणारा कचरा आता कांजूरमार्ग येथील डम्पिंगवर टाकला जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या घन कचरा विभागातील अधिकार्‍याने दिली.

मुलुंडच्या डम्पिंगचे क्षेत्र 24 हेक्टर असून तेथे 1967 पासून कचरा टाकला जात आहे. शहरातून दररोज साडेसात हजार टन कचरा जमा होतो, त्यापैकी दीड हजार ते दोन हजार टन कचरा या डम्पिंगमध्ये टाकला जातो. आतापर्यंत 70 लाख मेट्रिक टन कचरा टाकण्यात आला असून त्या कचर्‍याची उंची 30 मीटरपर्यंत पोहोचली आहे. डम्पिंगवरील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने विविध सल्लागारांवर कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र, त्यापैकी एकही प्रयोग यशस्वी झालेला नाही. कचर्‍याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी 2015 मध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर 2016 मध्ये दुसर्‍यांदा आणि 2017 मध्ये तिसर्‍यांदा निविदा काढण्यात आल्या. मात्र, प्रतिसाद दिलेल्या कंत्राटदारांकडे अद्ययावत तंत्रज्ञान नसल्याने यावर्षी फेब्रुवारीमध्ये पुन्हा निविदा काढण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisement -

कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी पहिल्या वर्षी प्रकल्पाची बांधणी व उभारणी केली जाणार आहे. दुसर्‍या वर्षी 11 लाख टन कचर्‍यावर, तिसर्‍या वर्षी 24 लाख टन, चौथ्या वर्षी 38 लाख टन, पाचव्या वर्षी 53 लाख टन तर सहाव्या वर्षी 70 लाख टन कचर्‍यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाणार आहे.

कचर्‍याची विल्हेवाट लावताना कचर्‍यापासून कंपोस्ट खत बनवले जाणार आहे. त्यातून उरलेले मेटल लाकूड यांचा पुनर्वापर केला जाणार असून राहिलेली माती भरणी कामासाठी वापरली जाणार आहे. सहा वर्षात डम्पिंगच्या जागी चांगले उद्यान उभारले जाणार असल्याचे या अधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisement -

या कंपन्यांना काम देणार

डम्पिंगवर गेल्या 44 वर्षांपासून कचरा टाकला जातो. सध्या जमा असलेल्या 70 लाख मेट्रिक टन कचर्‍यापैकी 60 लाख टन कचर्‍यावर प्रक्रिया करून भूखंड रिकामा करण्यात येणार आहे. त्यासाठी मे. एस 2 इन्फोटेक इंटरनॅशनल, मे. प्रकाश कॉन्स्ट्रोवेल लि. आणि मे. ई. बी. एन्व्हायरो यांना एकत्रित काम देऊन त्यासाठी 731 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -