मुंबई ब्लॅकआऊट : मुलुंडकरांच्या घरात आली १४ तासांनी वीज !

मुंबईतील टाटा पॉवर, अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड, महावितरण आणि बेस्ट उपक्रम या वीज वितरण कंपन्यांच्या वीज ग्राहकांची वीज ग्रीड कोलॅप्सच्या घटनेनंतर टप्प्याटप्प्यानंतर पूर्ववत झाली. पण मुलुंड परिसर गाजला तो म्हणजे याठिकाणची वीज १४ तासांनी आल्यामुळे. ऑक्टोबर हिटचा कहर आणि काळोखाची भर अशीच अवस्था मुलुंडकरांची सोमवारच्या पॉवरकटमुळे झाली होती.
मुलुंडमध्ये महावितरणच्या यंत्रणेतून वीज पुरवठा करण्यात येतो. पण वीज यंत्रणेकडून टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यात येत असल्यानेच मुलुंडमधील वीज ग्राहकांना तब्बल १४ तास वीज पुरवठा पूर्ववत होण्याची वाट पहावी लागली. महावितरणच्या ५८ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा हा ११ तास खंडित झाला होता. त्यानंतर या वीज ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. पण महावितरणच्या यंत्रणेत मात्र ७५ हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. महावितरणमार्फत रात्री १२.३० वाजता हा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.
महावितरणच्या यंत्रणेत अनेक टप्प्यात वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला होता. पण मुलुंडमधील एकुण सव्वा लाख वीज ग्राहकांना सकाळी १० वाजल्यापासून रात्रीपर्यंत काळोखात राहण्याशिवाय पर्याय नव्हता. मुंबई उपनगरातील इतर भागात मात्र सायंकाळपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला. अदाणीच्या वीज ग्राहकांचा सायंकाळी ७ वाजेपर्यंत वीज पुरवठा अनेक टप्प्यात सुरळीत झाला. तर बेस्ट उपक्रमाच्या मुंबई शहरातील वीज ग्राहकांचा वीज पुरवठा हा सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरळीत झाला. टाटा पॉवरच्या वीज ग्राहकांचाही वीज पुरवठा सायंकाळपर्यंत टप्प्याटप्प्याने सुरळीत झाला. पण महावितरणच्या यंत्रणेतील मुलुंड परिसरातील वीज पुरवठा मात्र बराच वेळ पूर्ववत झाला नव्हता. लोड डिस्पॅच सेंटरमार्फत टप्प्याटप्प्याने अनेक भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात येत होता. त्यामुळेच मुलुंडचा वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी वेळ लागला असे कळते. एकाचवेळी वीज यंत्रणेवर ताण येऊ नये म्हणून अनेक टप्प्यात वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.