घरमुंबईमुंबई भाजपच्या अध्यक्षपदासाठी मुख्यमंत्र्यांंचे गुजराती कार्ड!

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदासाठी मुख्यमंत्र्यांंचे गुजराती कार्ड!

Subscribe

२०१४ ची लोकसभा त्यानंतर विधानसभा, मुंबई महानगरपालिका आणि पुन्हा २०१९ ची लोकसभा या सगळ्या निवडणुकांमध्ये मुंबईकरांनी भाजपला भरभरून मतं दिल्यानंतर आता या मराठमोळ्या शहरात गुजराती कार्ड वापरण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित केलं आहे. मुंबई भाजपचा नवा अध्यक्ष गुजराती भाषिक असावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी चाचपणी सुरू केली असून, त्यात नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक हे मंगलप्रभात लोढा यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत.

किंबहुना त्यांनाच मुंबई अध्यक्ष करण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे, तर शिवसेनेसारख्या मराठमोळ्या पक्षाला टक्कर देण्याकरिता मुंबई अध्यक्ष हा सामान्य कार्यकर्त्यांमधील मराठमोळा चेहरा असावा, अशी भाजपमधील कार्यकर्त्यांची आणि दुसर्‍या प्रवाहाची धारणा आहे. त्यामुळे मराठी चेहरे म्हणून अतुल भातखळकर, पराग अळवणी या आमदारांबरोबर सुनील राणे या अस्सल मराठमोळ्या चेहर्‍याचीही चर्चा सुरू आहे. मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाचा निर्णय हा स्वतः नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे संयुक्तरित्या घेणार आहेत. त्यामुळे या निवडीकडे मुंबईचेच नव्हे तर देशभरातील भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र भाजपमध्ये २०१४ च्या निवडणुकीपूर्वी गडकरी आणि मुंडे या दोन मोठ्या नेत्यांचे गट कार्यरत होते. यापैकी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर आणि नितीन गडकरी दिल्लीमध्ये स्थिरावल्यानंतर महाराष्ट्र भाजपमध्ये पूर्णतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच वर्चस्व आहे. राष्ट्रीय भाजपच्या कार्याध्यक्षपदी जे.पी. नड्डा यांची निवड झाल्यानंतर आता लवकरच भाजप प्रदेशाध्यक्षाची निवड होणार आहे. ही जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारावी, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी ही ‘अ‍ॅसिड- टेस्ट’ आपल्याला नको असा पवित्रा पाटील यांनी घेतला आहे. त्यामुळे रणजीत सिंह पाटील, संभाजी निलंगेकर-पाटील यांची नावेही चर्चेत आहेत. प्रदेशाध्यक्षापेक्षा राज्यभरात खरी चर्चा आहे ती मुंबई भाजपचा अध्यक्ष कोण होणार? याचीच…आशिष शेलार यांनी सहा वर्षे मुंबई भाजपची जबाबदारी पार पाडली.

अस्सल मराठमोळ्या सातरस्तासारख्या भागात लहानपण घालवलेल्या आणि आता वांद्रे पश्चिमेला रहात असलेल्या आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या विरोधात शड्डू ठोकत पक्षाला यश मिळवून दिलं. शिवसेनेच्या अरेला कारे करण्याचं त्यांचं धाडस भाजपला घवघवीत यश मिळवून देणारं ठरलं. शिवसेनेची खरी ताकद असलेल्या मुंबई महानगरपालिकेत भाजपचे फक्त ३२ नगरसेवक होते. मोदी लाटेमध्ये ही संख्या ८२ वर गेलेली आहे. लाट मोदींची असली तरी त्याचं श्रेय प्रामुख्याने आशिष शेलार यांना दिलं जातं. कारण याआधीच्या कुठल्याही भाजपच्या अध्यक्षाने शिवसेनेच्या टोल्याला टोला देण्याची भाषा केली नव्हती. आशिष यांनी ते धाडस केलं आणि त्यांचा फॉर्म्युला यशस्वी ठरला.

- Advertisement -

२०१४ पासून प्रत्येक वेळेला मंत्रिमंडळ विस्तारात शेलार यांना डावलण्यात येत होतं. काही वेळा शेलार यांना मंत्रिमंडळात घ्यावं लागेल म्हणून विस्तारच पुढे ढकलण्याच्या घटना घडल्या आहेत. आता निवडणुकीला चार महिने शिल्लक असताना शेलार यांना मंत्री करण्यात आले. तिथेही त्यांच्या आवडीच्या गृहनिर्माण ऐवजी विनोद तावडे यांचे शालेय शिक्षणमंत्री हे महत्त्वाचे खाते काढून ते शेलार यांना देण्यात आलं आहे. त्यामुळे नवा भाजप अध्यक्ष कोण असणार याबद्दल पक्षात आणि पक्षाबाहेरही जोरदार चर्चा सुरू आहे.

सेनेच्या नाराजीमुळे किरीट सोमय्या यांना लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली. त्याऐवजी ती उमेदवारी पालिकेत तिसर्‍यांदा नगरसेवक असलेल्या मुलुंडच्याच मनोज कोटक यांना देण्यात आली. कोटक कच्छी गुजराती असून, मुंबईतील बांधकाम व्यावसायिक आणि गुजराती ठेकेदारांमध्ये त्यांची ऊठबस आहे.

भाजपमधील अनेक व्यावसायिक नेत्यांच्या सदिच्छा पुस्तकात ते वरच्या स्थानावर आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी ईशान्य मुंबईतील तीन ठिकाणी कोटक यांचा प्रचार केला होता. त्या अन्य कोणत्याही उमेदवाराच्या प्रचारासाठी गेल्या नव्हत्या.

स्वतः मुख्यमंत्री हे कोटक यांचे हितचिंतक आणि ’गॉडफादर’ समजले जातात. ठाणे, मुलुंड आणि नवी मुंबईतील अनेक वादग्रस्त व्यक्तींची कामे कोटक यांनी मुख्यमंत्र्यांकडे विशेष पाठपुरावा करून मार्गी लावून दिल्यामुळे त्यांना अशाच प्रश्नचिन्हांकित व्यक्तींचा गराडा असतो. त्यामुळे अनेक सामान्य कार्यकर्ते आणि कोटक यांच्यामध्ये दरी निर्माण झाली असल्याची चर्चा पक्षात दबक्या आवाजात सुरू आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेले यश हे केवळ मोदी सुनामीमुळे असल्याचं स्पष्ट झालं आहे. लोकसभेतील आपल्या विजयानंतर करण्यात आलेल्या नागरी सत्काराच्या वेळेस ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना व्यासपीठावर न बसवता प्रेक्षकांमध्ये बसवल्यामुळे कोटक यांच्यावर निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होते.

कारण शिवसेना पक्षप्रमुखांवर जाहीरपणे टीका करत महापालिका घोटाळ्याचा जाब सोमैया यांनी ठाकरेंना विचारताच सार्‍या मुंबईसह दिल्लीतही सौमय्यांच्या आक्रमक टिकेचे पडसाद उमटले. शेलार यांच्यापेक्षा सोमय्यांच्या टिकेने मातोश्री अधिक घायाळ झाली. याउपरही कोटक यांनी सोमय्यांच्या केलेल्या अपमानामुळे भाजप कार्यकर्ते दुखावलेत. नगरसेवक, गटनेतेपद, खासदारकी अशी सगळी ‘लाभकारक’पदं फक्त एकाच व्यक्तीकडे देण्यात आल्यामुळे ईशान्य मुंबईतील पराग शहा, प्रवीण छेडा, राम कदम, प्रकाश मेहता नाराज आणि संतप्त आहेत. अवघ्या सहा वर्षात कोटक – फडणवीस यांचा झालेला हा घट्ट दोस्ताना अनेक निरीक्षकांना चक्रावून टाकणारा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी – आणि अमित शहा यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रकाश मेहता यांना महत्प्रयासाने मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. त्याऐवजी शांत, संयमी आणि पडत्या फळाची आज्ञा घेऊन काम करणार्‍या योगेश सागर यांना मंत्रिमंडळात स्थान दिले गेले. शेलार यांच्यानंतर मुंबई अध्यक्षपदासाठी योगेश सागर यांची निवड निश्चित होणार होती. मात्र, मेहता यांचा काटा दूर करण्यासाठी सागर यांना मंत्रिमंडळात घेण्यात आले आहे. आधी किरीट सोमय्या त्यानंतर प्रकाश मेहता या दिल्ली दरबारात वजन असलेल्या दोन प्रमुख गुजराती नेत्यांना सक्तीची विश्रांती देण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरले आहेत. मुंबईतील गुजराती मतांवर भिस्त असलेल्या भाजपला या गुजु वोटबँकेला आपल्याजवळ ठेवण्यासाठी एका गुजराती चेहर्‍याचीच गरज आहे. ती गरज लोढा पूर्ण करू शकतात. मंत्रिमंडळातून मेहतांना काढून लोढांना घेतील असा राजकीय जाणकारांचा समज होता.

मात्र, मंत्रिमंडळात त्यांचा समावेश न झाल्यामुळे त्यांनी आपल्या कार्यालयात जोरदार आदळ-आपट करत काही काचेच्या वस्तूंची तोडफोड केल्याची चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चवीने केली जातेय. युतीसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघातून सर्वाधिक 60 हजार मतांची आघाडी मलबार हिल परिसरातून मंगल प्रभात लोढा यांनी सेनेच्या अरविंद सावंत यांना मिळवून दिली होती. पक्षनिधी, कार्यकर्ते, मतांची बेगमी, आमदारांची कुमक हे जमवण्यासाठी लोढा सरस ठरू शकतात. मात्र, दिल्लीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे लोढांना थेट प्रवेश असल्यामुळे ते मुख्यमंत्र्यांना अडचणीचे ठरू शकतात. सध्या दिल्लीत मुख्यमंत्र्यांचे खूपच लक्षणीय वजन आहे. लोढा त्यात वाटेकरी ठरतील याच गोष्टीसाठी लोढांऐवजी कोटक यांना पसंती देण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव यांना आपले थोरले बंधू असल्याचे जाहीरपणे मान्य करताहेत, त्याचवेळी भाजपला मात्र धाकटा बंधू होऊ देण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी नाही. त्यामुळेच शिवसेना ही मराठी अस्मिता, मराठी बाणा आणि मराठी माणूस या जोरावर भाजपला कोंडीत पकडू शकते, अशी स्थिती आहे. यासाठी मुंबई अध्यक्ष म्हणून मराठी चेहर्‍याची निवड करावी, असा एक दुसरा मतप्रवाह पक्षात सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्ताराआधी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ मंत्री विनोद तावडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांकडे निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांची अडचण, नाराजी आणि नेत्यांकडून केला जाणारा दुर्लक्षितपणा बोलून दाखवला. तावडे यांचा रोख प्रामुख्याने प्रविण दरेकर, प्रसाद लाड आणि आर. एन.सिंग या आयात केलेल्या नेत्यांवर होता. पक्षाला सर्वोत्तम दिवस असताना कार्यकर्त्यांच्या पदरात निराशा पडणार असेल तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो, अशी भावनाही तावडे यांनी बोलून दाखवली. तावडे यांच्या काही मुद्द्यांवर मुख्यमंत्री आणि पाटील दोघेही काही काळ निरुत्तर झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. मात्र, त्यानंतर तावडेंचे राजकीय पंख साफ छाटण्यात आले.

मुंबईत भाजपने आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली असली तरी वरळी, शिवडी,परळ आणि दादर या मराठमोळ्या विशेषतः कोकणी बहुल परिसरात भाजपला चमक दाखवता आलेली नाही. निवडणुकीपूर्वी शिवसेना नेहमीच मराठी बाणा, मराठी माणूस आणि मराठी अस्मिता यांच्या वल्गना करते आणि पारंपरिक मतदाराला घट्ट पकडून ठेवते ही बाब भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे मराठमोळ्या मुंबईत भाजपनेही ‘मराठी कार्ड’ खेळावं अशी भाजपमधील ज्येष्ठ पदाधिकार्‍यांची आणि सामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. यासाठी संघटन कौशल्याचा अनुभव असलेले भाजपचे निष्ठावंत असलेले कांदिवलीचे फायरब्रँड आमदार अतुल भातखळकर तसेच विलेपार्ले आमदार पराग अळवणी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. पराग अळवणी हे लहानपणापासूनच भाजपच्या संस्कारात वाढलेत.

अभावीपच्या मुशीत ते तयार झालेत. त्यांना मुंबईचे अध्यक्ष करावं यासाठी खासदार पूनम महाजन खूपच प्रयत्नरत आहेत. मात्र, पराग यांनी आपल्या पत्नीच्या महापालिका निवडणुकीतील तिकिटासाठी पक्ष सोडला होता आणि अपक्ष निवडणूक लढवून ज्योती अळवणी यांना निवडून आणले होते. ही गोष्ट त्यांच्यासाठी अडचणीची ठरत आहे. उच्चभ्रू विलेपार्ले परिसरामध्ये पराग अळवणी यांनी आमदार म्हणून केलेलं काम हे निव्वळ कौतुकास्पदच नसून पक्षासाठी अभिमानास्पददेखील आहे. अळवणी सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणून पक्षात ओळखले जातात. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी त्यांचा व्यक्तिगत मैत्र आहे. मात्र, याचा उपयोग अध्यक्षपदाच्या लढाईत बाजी मारण्यासाठी अळवणी यांना होणार का याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

अध्यक्षपदाच्या शर्यतीत तिसरे उमेदवार सुनील राणे हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे मानसपुत्र समजले जायचे. मुंडे यांच्या निधनानंतर नितीन गडकरी यांनी सुनील राणे यांची मुंबई पोर्ट ट्रस्टच्या संचालकपदी नेमणूक केली. मात्र, पोर्टट्रस्टच्या संचालक पदापेक्षा राणे यांनी वरळी आणि डिलाईल रोड परिसरातील बीडीडी आणि बीआयटी चाळीतील रहिवाशांच्या घरांच्या प्रश्नावर रान उठवलं. त्यातही पोलीस कर्मचार्‍यांच्या निवासस्थानाचा प्रश्नही राणे यांनी जोरदाररित्या लावून धरला. मुख्यमंत्र्यांनी त्यांना समर्थन देत शिवसेनेची व्होट बँक हलवण्यासाठी पाठिंबा दिलाआणि बीडीडी चाळवासीयांना मालकी घरं देण्याची योजना जाहीर केली. म्हाडा उपाध्यक्ष म्हणून संभाजी झेंडे निवृत्त झाल्यावर भूमिपूजन होऊनही योजना बारगळली. मुख्यमंत्र्यांनी म्हाडाच्या अध्यक्षपदापासून राणे यांना दूर ठेवत मधू चव्हाण यांची वर्णी लावली.

चव्हाण हे सेनेचे आमदार आणि अध्यक्ष उदय सामंत यांच्याच कलाने काम करत असल्याचं गृहनिर्माण विभागाचा कानोसा घेतला असता लक्षात येते. गेली 15 वर्ष सचिन अहिर या राष्ट्रवादीच्या मुंबईतील नेत्याशी टक्कर देत पोलीस आणि चाळकरी यांच्या घराचा प्रश्न सोडवताना राणे यांनी भाजपची व्होट बँक सुरक्षित ठेवली आहे. मुंबईतील देवनार येथे असलेली चिल्ड्रन सोसायटीची शेकडो एकर जमीन सर्व पक्षीय भूमाफियांनी गिळंकृत करायला सुरुवात केल्यानंतर आणि अनाथ – निराधार मुलांच्या समस्येने राज्यभर थैमान घातल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राणे यांना या सोसायटीचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त केले. आपल्याला दिलेली कामगिरी चोख बजावण्यासाठी प्रसिद्ध ‘येस- बॉस’ करण्यास तयार असलेले राणे मराठा समाजाचे आहेत. जमिनीवरच्या प्रश्नांची जाण असलेले आणि शिवसेनेच्या प्रत्येक डावपेचाशी परिचित असलेले सुनील राणे हे अध्यक्षपदासाठी योग्य निवड ठरू शकतील, अशी भाजप कार्यकर्त्यांत चर्चा आहे.

याआधी मनोहर जोशी, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण आदी मुख्यमंत्र्यांना निकटवर्तीयांच्या हितामध्ये अडकल्यामुळे खुर्ची सोडावी लागली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर साडेचार वर्षात कोणताही व्यक्तिगत आरोप झालेला नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या टप्प्यात अशी कोणतीही चूक करू नये की जेणेकरून त्यांना आणि पक्षाला त्याची राजकीय किंमत चुकवावी लागेल, अशी प्रतिक्रिया भाजपमधील ज्येष्ठ नेत्याने बोलून दाखवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -