घरमुंबईमुंबईकराचा पुन्हा काँग्रेसला हात

मुंबईकराचा पुन्हा काँग्रेसला हात

Subscribe
राज्यात आणि देशात निवडणुकांचे वारे वाहण्यापूर्वीच विविध पक्षांच्या अंतर्गत सर्वेक्षणाची रेलचेल सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात प्रदेश भाजपने केलेल्या सर्वेक्षणात पक्षाला परिस्थिती कठीण असल्याचे स्पष्ट झाल्यावर आता काँग्रेस पक्षाने मुंबईचा पक्षांतर्गत सर्व्हे करून घेतला. नेल्सन कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पक्षासाठी मुंबई पुन्हा सुरक्षित बनत असल्याचा दिशादर्शक अहवाल प्राप्त झाला आहे. मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांपैकी दोन जागा काँग्रेस पक्षाला हमखास प्राप्त होतील, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आगामी निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये ५०-५०चा फॉर्म्युला मंजुर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्या मतदारसंघात काय स्थिती आहे, याविषयी माहिती घेण्यासाठी राजकीय पक्ष, पक्षांतर्गत सर्वेक्षण करू लागले आहेत. गेल्या आठवड्यात भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत सर्वेक्षण करून घेतला.
या सर्वेक्षणात भाजपसाठी आगामी निवडणूक सोपी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेसोबत युती न करता निवडणूक लढल्यास पक्षाचे मोठे नुकसान होण्याचे शक्यता सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात भाजपच्या ४० आमदारांचे भवितव्य धोक्यात असल्याचे या सर्वेक्षणात उघड झाल्याने या आमदरांना अल्टीमेटम देण्याची तयारी पक्षाने सुरू केली आहे. भाजपनंतर आता काँग्रेस पक्षाने मुंबईचे स्वतंत्र सर्वेक्षण करून घेतले आहे. नेल्सन कंपनीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबईत काँग्रेस पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित करू शकते, असे या सर्वेक्षणात पुढे आले आहे.
सुमारे २ लाख ८० हजार इतक्या मतदारांची मते या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आली. उत्तर -मध्य मुंबई मतदारसंघात प्रिया दत्त यांना उमेदवारी देण्यात आल्यास त्या तेथून विजयी होऊ शकतात, असे नमूद करण्यात आले आहे. या मतदारसंघातील मुस्लिम मतदारांची संख्या ही सुमारे ६५ टक्के इतकी असल्याने या मतदारसंघाची उमेदवारी नसीम खान यांना दिल्यास त्याचा कितपत फायदा होईल, याचा अंदाज घेण्यात आला. पण खान मुस्लिम असूनही त्यांना मुस्लिमांची अपेक्षित मते मिळत नाहीत, हे या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. भाजपकडून या मतदारसंघात पुनम महाजन आणि सेनेकडून डॉ. दीपक सावंत यांना उमेदवारी देण्यात आल्यास या तिघांमधून प्रिया दत्त यांना अधिकची पसंती मिळत असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. या संघातल्या ४० टक्के इतक्या मतदारांनी दत्त यांना पसंती दर्शवल्याचे म्हटले आहे.
दक्षिण मध्य मुंबईचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याऐवजी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आल्यास या मतदारसंघात तगडी लढत होऊ शकते. मात्र वर्षा गायकवाड या लोकसभा निवडणूक लढवण्यास राजी नाहीत. एकनाथ गायकवाड यांना केवळ ३५ टक्के इतक्याच मतदारांची पसंती दिसते आहे. दुसरीकडे एनडीएचे स्वयंघोषित उमेदवार असलेले रिपाईंचे रामदार आठवले हे ३४ टक्के मते घेतील, असे अनुमान काढण्यात आले आहे.  भाजपकडून अशिष शेलार यांना उमेदवारी देण्यात आल्यास त्यांना दुसर्‍या पसंतीची मते मिळतील, तर शिवसेनेकडून राहुल शेवाळे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आल्यास त्यांना पहिल्या पसंतीची मते मिळतील, असे हे सर्वेक्षण म्हटले आहे.
सर्वेक्षणात दक्षिण मुंबईत काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना पहिली पसंती मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देवरा यांच्यानंतर अरविंद सावंत यांना ३७ टक्के इतकी मते मिळतील, अशी अपेक्षा सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे.  उत्तर पश्चिम मुंबईत गुरुदास कामत यांच्या कुटुंबातील कोणालाही उमेदवारी देण्यात आल्यास त्याला सहानुभूती मिळून सुमारे ४३ टक्के इतकी पसंती मिळाल्याचे स्पष्ट झाले. सेनेच्यावतीने गजानन किर्तीकर यांच्याऐवजी त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांना उमेदवारी दिली जाईल, असे सांगण्यात आले. मात्र इशान्य मुंबईत पुन्हा भाजपलाच पहिल्या पसंतीची मते मिळतील. तिथे किरीट सोमय्या यांनाच सर्वाधिक पसंती असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर उत्तर मुंबईत भाजपचे गोपाळ शेट्टी सर्वश्रेष्ठ ठरतील, असे नेल्सनच्या सर्वेक्षणात म्हटले आहे.
नेल्सन सर्वेक्षणातील वास्तव
मुंबईची लोकसंख्या  १ कोटी ३० लाख
मुंबईतील मतदारांची एकूण संख्या ८० लाख
प्रत्येक मतदारसंघातील मतांची संख्या १३ लाख
सर्वेक्षणाद्वारे मतदारांची जाणलेली मते २ लाख ८० हजार
मतदारसंघनिहाय जाणलेली मते ४० हजार
पसंतीचे संभाव्य उमेदवार
दक्षिण मुंबई
मिलिंद देवरा(काँग्रेस) ४३ टक्के
अरविंद सावंत(सेना) 37 टक्के
शायना एनसी(भाजप) ३५टक्के
उत्तर -पश्चिम
गुरुदास कुटुंबिय(संभाव्य काँग्रेस) ४६ टक्के
अमोल किर्तीकर(सेना) ३८ टक्के
जयप्रकाश ठाकूर(भाजप)३६ टक्के
संजय निरुपम(काँग्रेस) ३४ टक्के
ईशान्य मुंबई
किरीट सोमय्या(भाजप) ४३ टक्के
संजय दिना पाटील(राष्ट्रवादी) ३४ टक्के
शिशिर शिंदे(संभाव्य शिवसेना) २९ टक्के
उत्तर मुंबई-
गोपाळ शेट्टी (भाजप) ४४ टक्के
सुभाष देसाई(संभाव्य शिवसेना) २७ टक्के
गोविंदा(संभाव्य काँग्रेस) २९ टक्के
दक्षिण मध्यमुंबई
राहुल शेवाळे(शिवसेना) ४१ टक्के
रामदास आठवले(रिपाईं) ३४ टक्के
वर्षा गायकवाड(काँग्रेस) ३५ टक्के
अशिष शेलार(भाजप) ३५ टक्के
उत्तर मध्यमुंबई
प्रिया दत्त(काँग्रेस) ४३ टक्के
पुनम महाजन(भाजप) ४१ टक्के
दिपक सावंत(शिवसेना) ३८ टक्के
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -