घरमुंबईराज्याचा साथीचे रोग नियंत्रण कक्ष ‘नॉट रिचेबल’

राज्याचा साथीचे रोग नियंत्रण कक्ष ‘नॉट रिचेबल’

Subscribe

राज्यातील साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्याधुनिक व सक्षम नियंत्रण कक्ष असल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात येतो. मात्र शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मुंबईतील आरोग्य विभागात सुरू असलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष अनेक महिन्यांपासून दूरध्वनीअभावी ‘नॉट रिचेबल’ ठरत आहे.

राज्यातील साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्याधुनिक व सक्षम नियंत्रण कक्ष असल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात येतो. मात्र शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मुंबईतील आरोग्य विभागात सुरू असलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष अनेक महिन्यांपासून दूरध्वनीअभावी ‘नॉट रिचेबल’ ठरत आहे. ‘नियंत्रण कक्षातील दूरध्वनी यंत्रणा बंद असल्याने कुठलाही फोन किंवा संदेश प्राप्त झाला नाही. त्यामुळे माहिती निरंक समजावी’, असा शेरा लिहिण्यात येत आहे. म्हणून सुट्टीच्या दिवशी राज्यातील साथीच्या आजारांच्या माहितीची नोंद नियंत्रण कक्षाकडे होत नसल्याचे उघडकीस आले आहे. पुणे येथील राज्याच्या साथीचे रोग नियंत्रण कक्षाकडून नुकतेच जाहीर केलेल्या अहवालामध्ये राज्यात लेप्टोमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मुंबईमध्ये लेप्टोमुळे पाच जणांचा मृत्यू झाला होता. यातून राज्यातील साथीचे रोग नियंत्रण कक्ष व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील समन्वयाचा अभाव उघडकीस आला होता.

- Advertisement -

हिवताप, डेंग्यू, लेप्टो, कावीळ, गॅस्ट्रो, कॉलेरा यासारखे साथीचे आजार पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात उद्भवतात. वाढत्या साथीच्या आजारांवर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी विविध योजना राबवण्यासाठी आरोग्य विभागातर्फे साथीचे रोग नियंत्रण कक्ष चालवण्यात येते. या नियंत्रण कक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा रुग्णालयांना साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत केली जाते. राज्याचे साथीचे रोग नियंत्रण कक्ष पुण्यात असून, सर्व जिल्हा रुग्णालयातून तेथे माहिती पुरवण्यात येते. तसेच आरोग्य विभागाचे मुख्य कार्यालय मुंबईत असल्याने काही वर्षांपूर्वी आरोग्य भवनच्या आठव्या मजल्यावर आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू केले आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पुण्यातील साथीचे रोग नियंत्रण कक्ष बंद असल्याने राज्यातील विविध जिल्हा रुग्णालयातून साथीच्या आजाराबाबत माहिती मिळवण्यासाठी आरोग्य भवनमधील नियंत्रण कक्षामधून माहिती घेण्यात येते. यासाठी आरोग्य विभागातील विविध आस्थापनातील एक अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येते.

या कर्मचार्‍यांना काम करण्यासाठी ०२२२२७०३७८५ या क्रमांकाचा दूरध्वनीही देण्यात आला आहे. या दिवशीच्या कामाचा अहवाल आरोग्य सेवा (मुख्यालय) सहाय्यक संचालकांना सादर करणे बंधनकारक असते. मात्र हा दूरध्वनी बंद असल्याने येथे नियुक्त करण्यात येत असलेल्या कर्मचार्‍यांना राज्यातील जिल्हा हॉस्पिटलमधून माहिती घेता येत नाही. तसेच त्यांना त्यांच्याकडील माहितीही देता येत नाही. म्हणून नोंदवहीमध्ये ‘नियंत्रण कक्षातील दूरध्वनी यंत्रणा बंद असल्याने कुठलाही फोन किंवा संदेश प्राप्त झाला नाही, त्यामुळे माहिती निरंक समजावी’, असा शेरा लिहिण्यात येतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. यातून सरकार राज्यातील साथरोग नियंत्रणाबाबत किती सजग आहे, याचा प्रत्यय येतो.

साथरोग नियंत्रण कक्ष हे सक्षमपणे काम करत आहे. दूरध्वनी बंद आहे कि नाही याबाबत मला कल्पना नाही. पण नियुक्त कर्मचारी हे कमी शिकलेले असल्याने त्यांना नोंदवहीत काय नोंद करायची, याची माहिती नसल्याने ते चुकीची नोंद करत आहेत.
– डॉ. संजीव कांबळे, संचालक, आरोग्य विभाग

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -