मुंबईत ग्रीन फटाक्यांतही सापडले धोकादायक केमिकल्स

आवाज फाऊंडेशनने मुंबईतल्या मार्केटमध्ये आलेल्या फटाक्यांच्या केलेल्या चाचणीत आरोग्यासाठी धोकादायक अशा केमिकल्सचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळेच या फटाक्यांवर बंदी आणावी अशी मागणी आवाझ फाऊंडेशनने केली आहे. एकुण २८ फटाक्यांची चाचणी आवाझ फाऊंडेशनमार्फत करण्यात आली. या चाचणीमध्ये ग्रीन फटाक्यांमध्येही या धोकादायक केमिकल्सचा वापर झाल्याचे आढळले आहे. म्हणूनच मुंबईत या फटाक्यांवर सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी बंदी आणावी अशी मागणी आवाज फाऊंडेशनमार्फत करण्यात आली आहे. या फटाक्यांवर बंदी आणावी अशी मागणी करणारे पत्र आवाज फाऊंडेशनने मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

रहिवाशी भागांमध्ये वापरासाठी मंजुर करण्यात आलेले ग्रीन फटाक्यांमधील चक्री, पाऊस आणि सूरसुरीची चाचणी आवाज फाऊंडेशनमार्फत करण्यात आली. मुंबई महापालिकेने जारी केलेल्या निर्देशानुसार लहान मुलांकडून या फटाक्यांचा वापर होतो. महत्वाचे म्हणजे ग्रीन फटाक्यांवर नीरीचा स्टॅम्प आहे. या ग्रीन फटाक्यांमध्ये बॅरिअमचा वापर होत नाही म्हणून नीरीचा स्टॅम्प केला जातो. पण बॅरिअम नायट्रेटचा वापर या ग्रीन फटाक्यांमध्येही आढळलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या बॅरिअम नायट्रेटचा वापर ऑक्टोबर २०१८ मध्ये बंद केला होता. त्यासोबतच नायट्रेट आणि सल्फरचा वापरदेखील यामध्ये आढळला आहे.

मुलांसाठी हानीकारक असणाऱ्या केमिकल्सचाच वापर हा ग्रीन फटाक्यांमध्ये झालेला आहे हे या चाचण्यांमध्ये आढळले आहे. पण त्याहून धोकादायक म्हणजे बंदी असूनही या गोष्टींचा उल्लेख हा फटाक्यांच्या पॅकेजिंगवर आहे. या फटाक्यांमुळे कोविडच्या काळातला धोका आणखी वाढू शकतो. त्यामध्ये श्वसनाच्या विकाराचा मोठा संभाव्य धोका आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात विकल्या जाणाऱ्या फटाक्यांची चाचणी २०१५ पासून मुंबई प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फत सातत्याने होत आली आहे. पण यंदाच्या वर्षाच्या चाचणीचा अहवाल दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आलेला असतानाही जाहीर झालेला नाही. म्हणूनच तातडीने हे निकाल जाहीर करावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फत करण्यात आली आहे. दरवर्षी आवाज फाऊंडेशनसोबत होणारी संयुक्त चाचणीही यंदा एनवेळी रद्द करण्यात आली. त्यानंतर एमबीपीसीने स्वतंत्र अशी चाचणी केली.

फटाक्यांचे वितरण आणि विक्री करणाऱ्या दुकानांना परवाना घेण्याचा आदेश मुंबई महापालिकेकडून देण्यात आला आहे. पण अनेक ठिकाणी फटाक्यांची विनापरवाना विक्री सुरू आहे, असे आढळले आहे. त्यामुळे अनेक विक्रेते आणि वितरकांकडून मुंबई महापालिकेच्या आदेशाचा भंग होत असल्याचे समोर आले आहे. म्हणूनच मुंबई पोलिस आणि महापालिकेने अशा खुलेआम विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांचा शोध घ्यावा अशी मागणी आवाज फाऊंडेशनने मुख्यमंत्र्यांना केली आहे.