मुंबई मेट्रो १ सेवा विस्कळीत

वेस्टर्न एक्सप्रेस हायवे स्टेशननजीक तांत्रिक बिघाड

घाटकोपर अंधेरी वर्सोवा ही मुंबई मेट्रो १ ची सेवा आज तांत्रिक बिघाडामुळे उशिराने सुरू आहे. मेट्रो लाईन १ वर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे स्टेशन नजीक तांत्रिक बिघाडामुळे एक ट्रेन थांबली आहे. परिणामी मेट्रोची सेवा ६ मिनिटे उशिराने सुरू असल्याची माहिती मुंबई मेट्रो प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आली आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोईसाठी मेट्रो १ मार्फत दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.

सकाळच्या पिक अवर्सच्या काळातच मेट्रो मार्गावर बिघाड झाल्याने मेट्रो प्रवासासाठी प्रवाशांचा खोळंबा निर्माण झाला आहे. एन गर्दीच्या वेळेतच मेट्रोची सेवा विस्कळीत झाल्याने मेट्रोचे वेळापत्रक बिघडण्यावर त्याचा परिणाम झाला आहे. सकाळी ९.४५ च्या सुमारास वेस्टर्न एक्सप्रेस हायवे या मेट्रो स्टेशननजीक हा बिघाड निर्माण झाला असल्याचे मेट्रोमार्फत ट्विटरवरून स्पष्ट करण्यात आले आहे. या ट्रेनच्या खोळंब्यामुळे प्रवाशांना त्या बिघाड झालेल्या ट्रेनमधून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर स्टेशनवर दुसरी मेट्रो ट्रेन आली खरी, पण मेट्रो सेवा सुरळीत झाली नसल्याचे ट्विट प्रवाशांनीच केले आहे. त्यामुळे अंधेरी स्टेशनवर रखडलेल्या प्रवाशांनी मेट्रोच्या सेवेबाबत संताप व्यक्त केला आहे. मेट्रो सेवा विस्कळीत झाल्यानेच मेट्रो स्थानकांवरही प्रवाशांची गर्दी वाढायला सुरूवात झाली असल्याचे ट्विटही प्रवाशांमार्फत करण्यात आले आहे. अर्ध्या तासाहून अधिक कालावधीपेक्षा ट्रेन सेवा सुरू झाली नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.