महापालिकेने केला नवा नियम, कोविड रूग्णांच्या उपचारासाठी नवा प्रोटोकॉल अंमलात

महापालिका आयुक्त इकबाल चहल यांचे आदेश

Iqbal chahal
कोरोना बाधित रुग्णांना महापालिकेसह खासगी रुग्णालयात  दाखल करण्यासाठी महापालिकेच्या २४ विभाग कार्यलयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णालयात असलेल्या रिक्त खाटांची माहिती डॅशबोर्डच्या माध्यमातून नियंत्रण कक्षातील कर्मचारी घेत रुग्णालयाशी समन्वय साधून रुग्णाला दाखल करत असतात. परंतु मागील काही दिवसांत रुग्णांना परस्पर दाखल केले जात असून त्यानुसार डॅशबोर्ड अपडेट होत नाही. त्यामुळे यापुढे विभागीय नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून रुग्णाला दाखल केले जाईल, असे आदेशच महापलिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत
मुंबईतील रुगणालयांमध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या खाटांचे व्‍यवस्‍थापन अधिक प्रभावीप्रणे साध्‍य व्‍हावे, यासाठी महापालिकेने संगणकीय डॅशबोर्ड यापूर्वीच कार्यान्वित केले आहेत. या डॅशबोर्डवर संबंधित रुग्‍णालयांनी आपापल्‍या रुग्‍णालयातील माहिती नियमितपणे ‘अपडेट’ करणे गरजेचे आहे. मात्र काही रुग्‍णांलयाद्वारे ही माहिती वेळेत अपडेट केली जात नसल्‍यामुळे खाटांचे व्‍यवस्‍थापन करण्‍यात अडचणी येऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन वेळेत माहिती अपडेट न करणा-या रुग्‍णालयांना संबंधित नियमांनुसार नोटीस बजावण्‍याचे निर्देश यापूर्वी आयुक्तांनी दिले होते.
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्षातून कोविडच्या नियंत्रण कक्षाचे काम चालवले जाते. सुरुवातीपासून या कक्षाच्या वतीने रुग्णांना दाखल केले जायचे. परंतु जून महिन्यात विभागीय नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले. त्यामुळे यावरील भार कमी झाला आणि तिथूनच रुग्णांना सुविधा उपलब्ध होऊ लागल्या. परंतु काही लोकांना विभागीय नियंत्रण कक्षाचे हेल्पलाईन क्रमांक माहीत नसल्याने ते मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधायचे. पण तिथे प्रतिसाद न लाभल्यास थेट रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. मात्र, एखाद्या रुग्णालयाने  रुग्णाला दाखल केल्यानंतर  रिकाम्या खाटच्या जागी रुग्ण दाखल करून घेतल्याची  माहिती डॅशबोर्डवर अपडेट केली जात नव्हती. त्यामुळे तेथील रिक्त खाटाची माहिती विचारात घेऊन विभागीय नियंत्रण कक्षातून रुग्णाला तिथे पाठवले जायचे. पण प्रत्यक्षात तिथे खाट रिकामी नसल्याने मग रुग्णाला अन्य रुग्णालयात हलवण्याची कार्यवाही करावी लागायची. परिणामी रूग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता आयुक्तांनी अत्यंत चिंताजनक परिस्थिती रुग्ण असेल तरच परस्पर रुग्णालयाने त्यांना दाखल करून घ्यायचे. परंतु हे केल्यानंतर याची कल्पना नियंत्रण कक्षाला देत डॅशबोर्ड अपडेट करावा. मात्र अन्य रुग्णाला नियंत्रण कक्षाच्या माध्यमातूनच दाखल करून घ्यावे, असे निर्देश दिले आहेत.