घरमुंबईकेईएममधील परिचारिकांच्या जेवण, चहापानावर ४ कोटींचा खर्च!

केईएममधील परिचारिकांच्या जेवण, चहापानावर ४ कोटींचा खर्च!

Subscribe

केईएम रुग्णालयात दररोज ३०० निवासी परिचारिका सेवा देत आहेत.

मुंबई महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांपैकी एक असणाऱ्या केईएममध्ये रुग्णांसाठी सेवा देणाऱ्या परिचारिकांचे जेवण, चहापानावर पालिका तब्बल ४ कोटींचा खर्च करणार आहे. ३०० निवासी परिचारिकांसाठी दररोज ९९ रुपयांत नाश्ता, दोन वेळचे जेवण आणि १२०० अनिवासी परिचारिकांसाठी दररोज ५ रुपयांत चहाचा पुरवठा करण्यासाठी पालिका मे. स्टॅनी कॅटरर्स या कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी ४ कोटी रुपये मोजणार आहे. वाढती महागाई, गॅसचे वाढलेले दर, महागलेला भाजीपाला या गोष्टी विचारात घेता सदर कंत्राटदाराने चहा, नाश्ता आणि जेवण यांचे दिलेले दर समाधानकारक आहेत, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला होता. मात्र, समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सदर प्रस्ताव मंजूर न करता राखून ठेवला आहे.

केईएम रुग्णालयात दररोज ३०० निवासी परिचारिका सेवा देत असून त्यांना नाश्ता, दोन वेळचे जेवण रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात येते. तसेच निवासी परिचारिकांसोबतच १२०० अनिवासी परीचारिकांना दररोज एक वेळचा चहा देण्यात येतो. या चहा, नाश्ता, जेवणाचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराचे कंत्राट १० जानेवारी २०१९ रोजी संपुष्टात आले. मात्र, तांत्रिक बाबींमुळे पालिकेने त्वरित दुसरा कंत्राटदार नेमण्यासाठी नवीन टेंडर काढले नाही. प्रशासनाने २२ मार्च २०१९ ला टेंडर मागवले असता एकाच कंत्राटदाराने प्रतिसाद दिला. पालिका नियमानुसार, टेंडरला एकाच कंत्राटदाराने प्रतिसाद दिल्याने टेंडर प्रक्रिया रद्द करून पुन्हा २६ जुलै २०१९ रोजी नव्याने टेंडर काढले गेले. त्यावर पुन्हा एकाच कंत्राटदाराने प्रतिसाद दिल्याने पालिकेने त्याला निवडण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

या कंत्राटदाराने सुरुवातीला परिचरिकांना दररोज नाश्ता, दोन वेळचे जेवण पुरवण्यासाठी ११० रुपये आणि चहासाठी किमान ६.९० रुपये इतके दर दिले. मात्र, पालिका प्रशासनाला दर जास्त वाटल्याने कंत्राटदारासोबत निविदा समितीने वाटाघाटी केल्या. त्यानुसार त्याने पुढील तीन वर्षांसाठी ३०० निवासी परिचारिकांना दररोज ९९ रुपयांत नाश्ता, दोन वेळचे जेवण आणि १२०० अनिवासी परिचारिकांसाठी दररोज ५ रुपयांत चहाचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे पालिका प्रशासनाने मे. स्टॅनी कॅटरर्स या कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी ३ कोटी ९१ लाख २७ हजार २०० रुपये मोजण्याचा निर्णय घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -