मुंबईत नाल्यात वाहून गेला चिमुरडा!

हा मुलगा नाल्यात पडल्याचे सीसीटीव्ही फुटेज कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Mumbai

मुंबई उपनगरातील गोरेगाव पूर्वे कडील आंबेडकर चौक या भागातील चाळीत राहणारा दिव्यांश तिकडच्या नाल्यात पडला. ही घटना बुधवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. रात्रीच्या वेळी दिव्यांश घरातून बाहेर रस्त्यावर येत असताना तो उघड्या असलेल्या नाल्यात पडला आणि वाहून गेला.

नऊ तास उलटल्यानंतर ही चिमुरड्याचा शोध नाही

यावेळी मुसळधार पाऊस सातत्याने होत असल्याने या नाल्यातील पाण्याचा प्रवाह वेगाने होत होता. नऊ तास उलटले तरी अद्याप या चिमुरड्याचा शोध लागलेला नाही. दिव्यांश बराच वेळ झाला तरी कुठेही दिसत नव्हता. त्यामुळे त्याच्या आईला तो कुठेच दिसत नसल्याने त्याचा शोध घेण्यासाठी त्या चिमुरड्याच्या आईने घराजवळील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यानंतर तो नाल्यात पडल्याचे समोर आले.

शोध मोहीम सुरू

या दीड वर्षीय चिमुरड्यास शोधण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि पालिका कर्मचारी बुधवारी रात्रीपासून या घटनास्थळी उपस्थित होते. सध्या अग्निशमन दलाकडून त्या मुलाची शोध मोहीम सुरू असून नजर चुकवून घराबाहेर पडल्याने या मुलांवर हा क्षण ओढावला आहे.

दरम्यान, हा चिमुरडा दिव्यांश पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा मुलगा नाल्यात पडल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.