मुंबई पोलिसांकडून मीडियाचे TRP रॅकेट उघड; Republic TV ची चौकशी होणार

सोशल मीडियावर ८० हजार खोटे अकाऊंट्स उघडून ठाकरे सरकार आणि मुंबई पोलिसांच्या बदनामीचे षडयंत्र उघड केल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आता टीआरपीचा घोटाळा समोर आणला आहे. वृत्तवाहिन्यांना BARC कडून रेटिंग मिळत असते. बार्कच्या रेटिंगशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला गेला. BARC ने हंसा एजन्सीला रेटिंगच्या तपासासाठी नेमले होते. हंसा एजन्सीने एक सर्व्हे केला त्यात आढळले की काही लोक गरिब कुटुंबाना पैसे देऊन काही वृत्तवाहिन्या दिवसभरासाठी सुरु ठेवण्यास सांगत होते. त्याबदल्यात त्यांना पैसे दिले जायचे. या प्रकरणी फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा यांच्या मालकांना अटक करण्यात आले आहे. तसेच रिपब्लिक टीव्हीसाठी हा घोटाळा करण्यात आल्याचेही आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले.

आयुक्त परमबीर सिंग म्हणाले की, हंसा एजन्सीच्या काही माजी कर्मचाऱ्यांनी या घोटाळ्याची माहिती मुंबई पोलिसांना दिली होती. रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीला मागच्या काही दिवसांत अचानक मोठा TRP मिळायला सुरुवात झाली होती. याची दखल BARC (Broadcast Audience Research Council) कडून घेण्यात आली आणि हंसा एजन्सीला याचा तपास करण्याचे सांगितले होते, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

काही इंग्रजी वृत्तवाहिनी पाहण्यासाठी केबल ग्राहकांना महिन्याला शेकडो रुपये देण्यात येत होते. हे पैसे देण्यासाठी काम करणाऱ्या फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा यांच्या मालकांना अटक करण्यात आला आहे. त्यांच्यावर कलम ४०९, ४२० अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. तसेच ज्या रिपब्लिक वाहिनीसाठी हा घोटाळा करण्यात आला त्या वाहिनीची देखील चौकशी होणार आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या बँक अकाऊंट्सला तपासले जाईल, जाहीरातदारांकडून आलेल्या पैशांची चौकशी होणार त्यात काही बेकायदेशीर आढळल्यास जप्ती करण्यात येईल, अशी माहिती परमबीर सिंग यांनी दिली.