घरमुंबईनिर्भय वातावरणासाठी पोलिस राहिले तत्पर

निर्भय वातावरणासाठी पोलिस राहिले तत्पर

Subscribe

नवरात्रोत्सावात घडलेल्या गुन्ह्यांचा तात्काळ केला तपास

मुंबई : नवरात्रोत्सवात मुंबईमध्ये सगळीकडे उत्सवी वातावरण होते, मात्र या वातावरणावर विरजन पडू नये. मुंबईतील वातावरण रात्रं-दिवस सुरक्षित आणि निर्भय रहावे याकरता मुंबई पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. उत्सवाचा गैरफायदा घेऊन गुन्हेगारी प्रवृत्ती बळावू नये, याकरता पोलिसांनी विशेष प्रयत्न केले. तरी या कालखंडात जे गुन्हे घडले, त्यांचा तत्काळ उलगडा करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले.

अ‍ॅन्टॉप हिल परिसरात बाँब बनवताना स्फोट झाला. या घटनेचा पूर्णपणे तपास करुन बाँबचे साहित्य बाळगणार्‍यांना अ‍ॅन्टॉप हिल पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याचबरोबर दादरसारख्या गजबलेल्या परिसरात पहाटे एका इसमाचा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याही खुनाचा उलगडा अवघ्या काही तासात केला. मुंबई मालाडमध्ये झालेल्या मॉडेलचा खूनाचा उलगडाही अवघ्या ४ तासात करण्यात बांगुरनगर पोलिसांना यश आले.

- Advertisement -

शारीरिक संबंधास नकार दिल्याने मानसी दिक्षित या २० वर्षीय मॉडेलची हत्या करणारा तिचाच मित्र होता. सीसीटिव्ही आणि एका ड्राईव्हरने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी अवघ्या चार तासात त्याला अटक केली. मानखुर्द परिसरात शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचाही तपास वेगात करून पोलिसांनी चार जणांना अटक केली. त्याचबरोबर नवरात्रोत्सवाच्या दरम्यान हायप्रोफाईल परिसरात अंमली पदार्थांची तस्करी करणार्‍या महाविद्यालयीन मुलांना बळी बनवणार्‍या ड्रग रॅकेटचाही पर्दाफाश करण्यात मुबंई पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाला यश आले. एकूणच गेल्या दहा दिवसांत घडलेल्या या महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास जलदगतीने करुन पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले. त्यामुळे मुंबई पोलिसांची सजगता पुन्हा एकदा दिसून आली. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस नेहमीच धडपड करतात. आपले काम तत्परतेने बजावतात, अशी भावना यामुळे नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

संपूर्ण जगातील क्रमवारीत मुंबई पोलीस दल द्वितीय स्थानावर आहे. मुंबई शहर हे महत्वाचे आणि मोठे असल्याने या शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि मुंबईकरांना त्रास होवू नये हीच आमची भूमिका असते. पोलीस आपले काम तत्परतेने बजावत असतात, मात्र त्याचवेळी नागरीकांच्या सहकार्याचीही गरज असते. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे असते.
– मंजुनाथ सिंगे, प्रवक्ता, मुंबई पोलीस दल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -