म्हणूनच मुंबई पोलिसांकडून ऑपरेशन मशीदीचे भोंगे

ऑनलाईन अभ्यासात मशीदीच्या भोंग्याचा व्यत्यत

loudspeaker

दहीहंडी गणेशोत्सवामध्ये मुंबईकरांनी ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी यंदा कोरोनाच्या काळातही नवा पायंडा घातला खरा, पण आता ध्वनी प्रदुषणविरोधी कार्यकर्त्यांकडून मशीदीवरील भोंग्याचा आवाज नियंत्रणात आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गणेशोत्सव २०२० मध्ये ध्वनी प्रदुषणाची सर्वात कमी डेसिबल (डीबी) पातळी नोंदविल्यानंतर आवाज फाऊंडेशनने पोलिस आयुक्त परम बीर सिंग यांना पत्र लिहून शहरातील मशिदींमध्ये ध्वनी नियम लागू करण्याच्या मागणीसाठी केली आहे.

विविध भागातील नागरिकांनी मशीदींविरोधात केलेल्या तक्रारीच्या आधारावरच आवाज फाऊंडेशनने हे पत्र मुंबई पोलिसांना दिले आहे. सांताक्रुझ येथील मशीदीमध्ये भोंग्याचा वारंवार होणाऱ्या वापरामुळेच काही नागरिकांनी आवाज फाऊंडेशनकडे याबाबतची तक्रार दिली होती. सांताक्रुझ येथील हसनाबाद लेन येथील नागरिकांनी याबाबतची तक्रार केली होती. ध्वनी कायद्याशी संबंधित नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे नागरिकांनी तक्रारीत नमुद केले आहे. रहिवासी भागासाठी निश्चित करण्यात आलेल्या कमाल मर्यादेपेक्षा अधिक ध्वनी प्रदुषण होत असल्यानेच नागरिकांनी तक्रार केल्याचे आवाज फाऊंडेशनच्या संस्थापिका सुमैरा अब्दु्ल्लाली यांनी सांगितले. रहिवासी भागात दिवसा ५५ डेसिबल तर रात्रीच्या वेळी ४५ डेसीबल आवाजाची कमाल मर्यादा आहे. तर मशीदीतून येणारा आवाज हा ८२ डेसीबल ते ८७ डेसीबल असल्याची नागरिकांनी तक्रारी केली आहे. खुद्द उच्च न्यायालयानेच अशा स्वरूपाचा निकाल जाहीर केलेला आहे. आमच्याकडे आलेल्या तक्रारी आम्ही पुढील कारवाईसाठी पाठवल्या आहेत असे त्यांनी सांगितले.

मुंबई पोलिसांनीही या तक्रारींची दखल घेतली आहे. अनेक प्रकरणात मशीदीच्या भोंग्यांमधून ध्वनी प्रदुषणाची कमाल मर्यादा गाठल्यानेच अनेक ठिकाणचे भोंगे काढण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी जाहीर केले आहे. तसेच अनेक ठिकाणी पोलिसांकडून या भोंग्याच्या आवाजावर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. काही रहिवासी भागात विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करताना या भोंग्याचा आवाज येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळेच या भोंग्यावर कारवाई करण्यात आली आहे. अनेकदा शिकवताना ऑनलाईन हजर असणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष या भोंग्याच्या आवाजामुळे विचलित झाल्याचे लक्षात आले आहे.