घरट्रेंडिंगपावसाळ्यात 'या' ठिकाणी भेटतात 'मुंबई पोलीस' !

पावसाळ्यात ‘या’ ठिकाणी भेटतात ‘मुंबई पोलीस’ !

Subscribe

ट्वीटरवरुन नेहमीच अॅक्टिव्ह असणाऱ्या मुंबई पोलिसांनी एक नवं आणि आगळवेगळं ट्वीट केलं आहे. दिवसभर सोशल मीडियावर हे ट्वीट चांगलच व्हायरल झालं आहे.

मागील २ दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पावसामुळे लोकांची होणारी धावपळ, तुंबणारं पाणी, जागोजागी होणारं ट्रॅफिक आणि त्यातून वाट काढत जाणारी माणसं या गोष्टी मुंबईला नव्या नाहीत. मात्र, अशा परिस्थितीत खरं कौशल्य असतं ते या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुंबई पोलिसांचं. परिस्थिती कितीही बिकट असो, मुंबई पोलीस नेहमीच त्यांचं काम चोख बजावत असतात.  ‘सदरक्षणाय खलनिग्रणाय’ या ब्रीदवाक्याला जागं रहात मुंबई पोलीस नेहमीच सतर्क असतात. या संदर्भातलंच एक ट्वीट पोलीसांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन शेअर करण्यात आलं आहे. या ट्वीटद्वारे पोलिसांनी पावसामुळे त्रस्त झालेल्या तसंच पावसापाण्यात फसणाऱ्या मुंबईकरांना एकप्रकारे दिलासा दिला आहे. इतकंच नाही तर त्यांनी सामान्य नागरिकांना या खास ट्वीटद्वारे काही सूचनाही दिल्या आहे.

काय आहे ‘हे’ खास ट्वीट?

मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर पेजवरुन केलेल्या या ट्विटमध्ये आपल्याला ३ ते ४ ट्रॅफिक पोलीस दिसतात. हे सर्व पोलीस आपापल्या ड्युटीवर असून पिवळ्या रंगचा रेनकोट घालून ते रस्त्यावरील वाहतूक नियंत्रीत करत आहेत. हा फोटो शेअर करतेवेळी त्यांनी ‘अवर काईंड ऑफ मंडे मीटअप्स’ (आमच्या सोमवारच्या भेटीगाठी) असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोसोबत त्यांनी लिहीलं आहे, की ‘ज्याप्रमाणे मुंबईतला पाऊस जोरदार आहे, तसाच आमचा बंदोबस्तही जोरदार आहे. मुंबईकरांच्या मदतीसाठी आम्ही पावसातही सज्ज आहोत. तुमची काळजी घेण्यासाठी आणि तुम्हाला सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.’ यापुढे त्यांनी #RoadSafety #MumbaiRains असे हॅशटॅग वापरत मुंबईकरांना पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यावरुन वाहनं सावकाश चालवण्याचा सल्लाही दिला आहे.

- Advertisement -

दरम्यान मुंबई पोलिसांचं हे ट्विट आज दिवसभर सोशल मीडियावर चांगलंच गाजतं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या ट्वीटवर लोकांच्या सकारात्मक प्रितिक्रिया उमटत असून, अनेकांनी मुंबई पोलिसांचं कौतुक केलं आहे. मुंबई पोलीस त्यांच्यावर ट्वीटर अकाउंटवर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. याआधी मुंबई पोलिसांनी युटयूबवर फेमस झालेल्या आंटीचे ‘हॅलो फ्रेण्ड्स चाय पिलो’ हे वाक्य वापरत ‘हॅलो फ्रेण्ड्स हेलमेट पहनलो’ असं ट्वीट त्यांच्या अकाउंटवरुन पोस्ट केलं होतं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -