दिनू रणदिवे, सेबेस्टियन डिसोझा यांना मुंबई प्रेस क्लबचा जीवनगौरव पुरस्कार

मुंबई प्रेस क्लबतर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवन गौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून येत्या २८ जून रोजी त्यांचं वितरण होणार आहे.

Mumbai
Mumbai Press Club
मुंबई प्रेस क्लब

मुंबई प्रेस क्लबतर्फे दरवर्षी मुंबईच्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय ठसा उमटवणारी कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. यंदाही प्रेस क्लबने या पुरस्कारांची घोषणा केली असून ज्येष्ठ पत्रकार, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील कार्यकर्ते, दलित-आदिवासींच्या प्रश्नांसाठी कायमच लढा देणारे दिनू रणदिवे यांना आणि ज्येष्ठ वृत्त छायाचित्रकार सेबेस्टियन डिसोझा यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यांच्याशिवाय प्रेसक्लबचा जर्नलिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार द ट्रिब्युनच्या पत्रकार रचना खैरा यांना जाहीर करण्यात आला आहे. आधार कार्डसंदर्भात त्यांनी केलेल्या वृत्तांकनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याशिवाय मिड डेमध्ये आरे आणि त्यासंदर्भात पर्यावरणाचा ऱ्हास यावर रणजीत जाधव यांनी केलेल्या वृत्तांकनासाठी त्यांना स्टार मुंबई रिपोर्टर पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २८ जून रोजी एनसीपीएमधल्या जमशेद भाभा सभागृहात या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे.

कोण आहेत रचना खैरा?

आधार कार्डसाठी गोळा करण्यात येणारा डेटा सुरक्षित नसल्याचं आपल्या वृत्तांकनाच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवणाऱ्या द ट्रिब्युनलच्या पत्रकार रचना खैरा यांना जर्नलिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. आधार कार्डची माहिती हॅक करून तिचा गैरवापर शक्य आहे हे त्यांनी त्यांच्या वृत्तांकनातून दाखवून दिलं होतं. मात्र, त्याबदल्यात त्यांचं कौतुक न करता आधार प्राधिकरणाने रचना खैरा, ट्रिब्युनचे संपादक हरिश खरे आणि ट्रिब्युनवर गुन्हा दाखल केला.

दिनू रणदिवेंचा अल्प परिचय

१९५५ सालच्या गोवा मुक्ती संग्रमामध्ये दिनू रणदिवे कार्यरत होते. त्यानंतर छेडण्यात आलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये देखील त्यांनी उल्लेखनीय योगदान दिलं. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या संयुक्त महाराष्ट्र पत्रिकेपासून दिनू रणदिवेंची पत्रकारिता सुरू झाली. यादरम्यान काही काळा त्यांनी कारावासदेखील भोगला. बांगलादेश लढ्याचं त्यांनी केलेलं वार्तांकन वाचकांच्या विशेष पसंतीस उतरलं होतं.

कसाबचा ‘तो’ जगप्रसिद्ध फोटो!

सेबेस्टियन डिसोझा हे मुंबई मिररचे फोटोग्राफर. मुंबई हल्ल्यावेळी त्यांनी काढलेल्या अजमल कसाबच्या फोटोंमुळे ते चर्चेत आले. त्यांचे हेच फोटो जगभरात प्रसिद्ध झाले. २००२च्या गुजरात दंगलींसाठी देखील त्यांनी फोटोग्राफी केली होती.