Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई जानेवारीतही मुंबईत तुरळक पावसाची हजेरी

जानेवारीतही मुंबईत तुरळक पावसाची हजेरी

मुंबईत तापमानाचा पारा आणखी खाली जाणार

Related Story

- Advertisement -

दिल्लीचा पाऊस चर्चेत असतानाच आता मुंबई उपनगरातही पावसाची हजेरी रविवारी रात्री उशिरा लागली. मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी, कुर्ला, सांताक्रुझ यासारख्या भागात अतिशय तुरळक स्वरूपाचा पाऊस झाल्याची माहिती प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने जाहीर केली आहे. याआधीच आयएमडी मुंबईने अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी बरसू शकतात असे जाहीर केले होते. राज्यात येत्या दोन दिवसातही काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

येत्या ६ जानेवारी आणि ७ जानेवारी रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र तसेच काही आणखी ठिकाणी हलक्या पावसाच्या सरीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रविवारी झालेल्या पावसानेही मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले पहायला मिळाले. मुंबईतले तापमान रविवारी २३ डिग्री सेल्सिअस इतके होते. पावसाच्या तुरळक सरी बरसत असल्या तरीही राज्यातले किमान तापमान येत्या तीन ते चार दिवसात आणखी घसरण्याची शक्यता आयएमडी मुंबईने वर्तवली आहे. मुंबई आणि ठाण्यात किमान तापमान हे १६ डिग्री सेल्सिअस ते १८ डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल. तर नाशिक आणि पुण्यात किमान तापमान हे १४ ते १६ डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असणार आहे. राज्यातील अन्य भागात सरासरी किमान तापमान हे १६ डिग्री सेल्सिअस इतके असेल. तर दक्षिण महाराष्ट्रात किमान तापमान हे १८ ते २० डिग्री सेल्सिअस इतके असेल.

जानेवारी महिन्यातच मुंबईतले किमान तापमान हे १५ डिग्री सेल्सिअसच्या खाली राहिले आहे. २०१२ साली सर्वात किमान तापमान हे १० डिग्री सेल्सिअस इतकी नोंद झालेली आहे. गेल्या वर्षी २०२० मध्ये जानेवारी महिन्यात किमान तापमान २१.५ डिग्री सेल्सिअस अशी नोंद झालेली आहे. येत्या तीन ते चार दिवसात मुंबईत तापमानाचा पारा आणखी घसरेल अशी माहिती आयएमडी मुंबईचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. तापमानाचा पारा खाली आला तरीही खूप कडाक्याची अशी थंडी नसेल असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. हे फक्त थंडीचे झलक देणारे वातावरण असेल हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.


- Advertisement -

 

- Advertisement -