Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई 'पत्रकारांना सगळ्यांनीच वार्‍यावर सोडले!'

‘पत्रकारांना सगळ्यांनीच वार्‍यावर सोडले!’

Related Story

- Advertisement -

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्ताने शोधपत्रकारितेसाठी दिला जाणारा पद्मश्री यमुनाताई खाडिलकर पुरस्कार दै. ‘आपलं महानगर’चे विनायक डिगे यांना देण्यात आला आहे. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘मार्चमध्ये कोरोना आला आणि अवघ्या काही दिवसांत त्याने पत्रकारांना घरी बसवले. पत्रकारांच्या भरवशावर अनेकजण पद्मश्री, पद्मभूषण झाले, पण त्यांनी पत्रकारांना वार्‍यावर सोडले. सर्व मालकांनी पत्रकारांचा विश्वास गमावला आहे’, अशी हळहळ कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे यांनी व्यक्त केली. कोरोनामुळे मुंबई मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन कार्यक्रम गतवर्षी न झाल्याने पत्रकार दिनाच्या दिवशी ७९ वा वर्धापन दिन बुधवारी साजरा करण्यात आला. पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी प्रमुख पाहुणे चंद्रकांत वानखडे यांचा शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

कोरोनामुळे अनेक पत्रकार मेले, पण त्यांची बातमी झाली नाही. चौकटीतील स्वातंत्र्य ज्यांना उपभोगता आले नाही त्या पत्रकारांना चौकटीबाहेरील स्वातंत्र्य कशाला हवे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आता पत्रकारिता प्रोफेशन झाले आहे. पण प्रोफेशनमध्ये मिशन नाही. या प्रोफेशनमध्ये मिशनसाठी अवकाश आहे. तो पत्रकारांना वापरता आला पाहिजे, असे वानखडे यावेळी आपल्या भाषणात म्हणाले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

विनायक डिगे यांच्यासोबतच युगारंभकार सर्वोदयी कार्यकर्ते मधूसूदन सीताराम रावकर स्मृती पुरस्काराने दै. ‘अजिंक्य भारत’चे प्रमोद चंचूवार, समतानंद अनंत हरी गद्रे पुरस्कार मुक्त संवादचे सल्लागार संपादक शेखर देशमुख, दिवंगत अ‍ॅड. अधिक शिरोडकर पुरस्कृत तोलाराम कुकरेजा पुरस्काराने इकॉनॉमिक टाइम्सचे मुख्य छायाचित्रकार नितीन सोनावणे, प्रा. भालचंद्र खांडेकर स्मृती पुरस्काराने दै. रामप्रहरचे उपसंपादक सुधाकर जगताप यांना गौरवण्यात आले.

पत्रकार दिनानिमित्त दिल्या जाणार्‍या पुरस्कारांमध्ये बृहन्मुंबईतील नागरी समस्यांवरील वर्षभरातील उत्कृष्ट वृत्तांत, स्तंभ व लिखाण यासाठी दिला जाणार्‍या आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्काराने झी २४ तासचे कृष्णात पाटील, पत्रकारितेला उपयुक्त ठरणार्‍या विषयावर (सामाजिक, आर्थिक, पर्यावरण आदी) लेखन करणार्‍या पत्रकाराचे चालू वर्षातील उत्कृष्ट पुस्तकासंदर्भात दिला जाणारा जयहिंद प्रकाशन पुरस्काराने मुंबई दूरदर्शनचे वृत्तसंपादक डॉ. नरेंद्रकुमार विसपुते, कामगार, झोपडपट्टी, भाडेकरू, घरदुरुस्ती व दलितोद्धार या विषयांवरील पत्रकारितेसाठी दिला जाणारा कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार दिव्य मराठीचे प्रशांत पवार, तर पत्रकाराने केलेल्या ललित लेखनासाठी दिला जाणारा विद्याधर गोखले पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये यांना गौरवण्यात आले. उत्कृष्ट राजकीय बातम्या व राजकीय वृत्तांताबद्दल दिला जाणार्‍या रमेश भोगटे स्मृती पुरस्काराने न्यूज २४ चे विनोद जगदाळे, तर शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट बातम्यांसाठी दिला जाणारा ‘शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे स्मृती पुरस्काराने दै.‘सामना’च्या मेघा गवंडे यांना गौरवण्यात आले.

- Advertisement -

प्रसारमाध्यमांवर आलेल्या कोरोना संकटाकडे लक्ष देऊन सरकारने पत्रकारांना दिलासा द्यावा, असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी केले. संघाचे उपाध्यक्ष संजय परब यांनी मान्यवरांची ओळख करून दिली. संघाचे कार्यवाह विष्णू सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

- Advertisement -