घरमुंबईअश्वमेधच्या नियोजनात मुंबई विद्यापीठ नापास

अश्वमेधच्या नियोजनात मुंबई विद्यापीठ नापास

Subscribe

निरिक्षण समितीने नोंदविले आक्षेप, दोनवेळा पुढे ढकलावे लागले उद्घाटन

तब्बल २२ वर्षांनंतर मुंबई विद्यापीठाला ‘अश्वमेध’ राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे यजमानपद मिळाले आहे, परंतु महोत्सव सुरू होण्यापूर्वीच वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. महोत्सवाच्या आयोजनात विद्यापीठ प्रशासन सपशेल नापास ठरल्याने दोनवेळा कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला. विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारामुळे राज्यपालांनी महोत्सवाच्या उद्घाटनाला येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. महोत्सवांतर्गत होणार्‍या स्पर्धांचे आयोजन एकाच ठिकाणी न करता वेगवेगळ्या कॉलेजांमध्ये केल्याने स्पर्धकांची दमछाक होणार आहे.

मुंबई विद्यापीठात गुरुवारपासून २२ वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव होणार आहे. राज्यातील उच्च शिक्षणातील मानाचा आणि प्रतिष्ठेचा हा महोत्सव मानला जातो. विद्यापीठात यापूर्वी १९९७ मध्ये हा महोत्सव झाला होता. त्यानंतर २२ वर्षांनतंर मुंबई विद्यापीठाला यजमान पदाचा मान मिळाला. मात्र, विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनामुळे हा महोत्सव चर्चेत आला. महोत्सवाच्या नियोजनावर देखरेख करण्यासाठी पुण्यातून विशेष समिती काही दिवसांपूर्वी विद्यापीठात आली होती. समितीने राजभवनाला अहवाल सादर केला असून, विद्यापीठाच्या नियोजनात त्रुटी असल्याचे नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली. महोत्सव प्रथम डिसेंबरमध्ये होणार होता. मात्र, नियोजनाअभावी उद्घाटन पुढे ढकलण्यात आला. महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मुंबई विद्यापीठाने राज्यपालांनाही दोनवेळा निमंत्रित केले होते. मात्र, निरिक्षण समितीच्या अहवालानंतर राज्यपालांनी महोत्सवाला येणे टाळल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

मुंबई विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडे चौकशी केली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

विद्यार्थ्यांना बसणार फटका
क्रीडा महोत्सवात पाच क्रीडा स्पर्धा होणार असून, यासाठी प्रथम कलिना कॅम्पसमधील जागा निश्चित केली होती. मात्र, आता विविध कॉलेजांच्या प्रांगणात स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे स्पर्धकांची चांगलीच दमछाक होणार असल्याची खंत अन्य विद्यापीठांकडून व्यक्त करण्यात आली.

- Advertisement -

एक महिना अगोदर सल्लागार समिती
महोत्सवाचे यजमान पदाबाबत दोन वर्षांपूर्वी विद्यापीठाला कळवले होते. मात्र, विद्यापीठाचा अनागोंदी कारभार येथेही पहायला मिळाला. विद्यापीठाने महोत्सवासाठी एक महिन्यापूर्वी म्हणजे नोव्हेंबर २०१८ मध्ये विशेष समितीची स्थापना केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -