घरमुंबईमुंबई विद्यापीठाचा कर्मचार्‍यांच्या जीवाशी खेळ

मुंबई विद्यापीठाचा कर्मचार्‍यांच्या जीवाशी खेळ

Subscribe

परीक्षा भवनाच्या नव्या इमारतीला परवानगी नसतानाही कार्यालये स्थलांतरित, प्रत्यक्षात दोन वर्षांपासून तयार असलेल्या या इमारतीला अद्याप भोगवटा प्रमाणापत्र (ओसी) आणि अग्निशमन दलाचे अग्निसुरक्षा प्रमाणपत्र मिळाले नाही. कोणतीही परवानगी नसलेल्या इमारतीमध्ये कार्यालये स्थलांतरित करून मुंबई विद्यापीठ कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करत असल्याची चर्चा विद्यापीठामध्ये रंगली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये परीक्षा भवनाची नवी इमारत दोन वर्षांपासून बांधून तयार आहे. त्यामुळे जुन्या परीक्षा भवनातील कार्यालये नव्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याच्या सूचना कुलगुरूंनी दिल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात दोन वर्षांपासून तयार असलेल्या या इमारतीला अद्याप भोगवटा प्रमाणापत्र (ओसी) आणि अग्निशमन दलाचे अग्निसुरक्षा प्रमाणपत्र मिळाले नाही. कोणतीही परवानगी नसलेल्या इमारतीमध्ये कार्यालये स्थलांतरित करून मुंबई विद्यापीठ कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करत असल्याची चर्चा विद्यापीठामध्ये रंगली आहे.

सध्या असलेल्या परीक्षा भवनाच्या शेजारीच सात मजली नवे परीक्षा भवन उभारण्यात आले आहे. दोन वर्षांपासून ही इमारत तयार असल्याने नव्या इमारतीमध्ये जाण्याची उत्सुकता परीक्षा भवनातील सर्वच कर्मचार्‍यांना लागली होती. लॉकडाऊन होण्याच्या काही दिवस अगोदर परीक्षा भवनातील पुनर्मूल्यांकन विभाग नव्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याच्या सूचना कुलगुरूंनी दिल्या होत्या. लॉकडाऊनमुळे ते शक्य न झाल्याने आता कार्यालय स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुनर्मूल्यांकन विभागाबरोबरच अन्य विभागही स्थलांतरित करण्याच्या सूचना कुलगुरूंनी दिल्या आहे. मात्र इमारतीमध्ये अनेक ठिकाणी गळतीची समस्या असून, इलेक्ट्रिकल व फायर डक्टच्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. इमारतीमधील सेंट्रल एसी बंद असून, लिफ्टही वारंवार बंद पडत असते. अस्वच्छ स्वच्छतागृह, पाण्याशिवाय असलेले कुलर, पायर्‍यांवर जमा केलेला कचरा यासारख्या असुविधांमुळे कर्मचारी नव्या परीक्षा भवनामध्ये जाण्यास अनिच्छा दर्शवत आहेत. इमारतीला भोगवटा व सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले नसल्याने कंत्राटदाराने इमारतीचे हस्तांतरण अद्याप मुंबई विद्यापीठाला केलेले नाही. इमारतीचे हस्तांतरण न झाल्याने विद्यापीठाच्या सामान्य प्रशासन विभागाने साफसफाई करण्यास नकार दिला आहे. इमारतीमध्ये ठिकठिकाणी कागदाचे गट्ठे फेकून दिल्याने नवीन इमारतीची दुरवस्था झाली आहे. इमारतीच्या कार्यालयामधील विविध कामे ही निकृष्ट दर्जाची केलेली आहेत. कुलगुरू, अधिकारी यांच्या केबिन व अन्य खोल्यांमधील फर्निचर हे विनावापर पडून असल्याने त्याला वाळवी लागून ते खराब होऊ लागले आहे. ही वाळवी सर्वत्र पसरल्यास इमारतीमध्ये स्थलांतरित होणार्‍या अन्य कार्यालयांची कागदपत्रे, कपाटे वाळवीने खराब होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा भवनामध्ये नेहमीच विद्यार्थ्यांची गर्दी असते. विशेषत: परीक्षेपूर्वी आणि निकालानंतर परीक्षा भवनाला जत्रेचे स्वरुप येते. त्यामुळे अस्वच्छता, सुरक्षेचा अभाव, नव्या इमारतीला न मिळालेले भोगवटा प्रमाणपत्र व अग्निसुरक्षा प्रमाणपत्र यामुळे या इमारतीमध्ये कार्यालये स्थलांतरित करणे म्हणजे कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या जीव संकटात टाकण्यासारखे असल्याचे मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी सांगितले.

कंत्राटदाराने इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे. त्यामुळे इमारतीच्या बांधकामाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई होणे आवश्यक आहे. इमारतील भोगवटा व अग्निसुरक्षा प्रमाणपत्र न मिळाल्याने भविष्यात इमारतीमध्ये कोणती दुर्घटना झाल्यास त्याची जबाबदारी विद्यापीठ प्रमुख म्हणून कुलगुरू स्वीकारणार आहेत का ?
– सुधाकर तांबोळी, सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -