घरमुंबईमुंबईत ५ हजार रक्त बाटल्यांचा तुटवडा!

मुंबईत ५ हजार रक्त बाटल्यांचा तुटवडा!

Subscribe

उन्हाचा वाढता तडाखा व उन्हाळ्याच्या सुटीमध्ये बाहेरगावी जाणाऱ्यांची वाढती संख्या पाहाता एप्रिल महिन्यापासून मुंबईत रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. ही गंभीर परिस्थिती येत्या जून महिन्यापर्यंत तशीच राहील, अशी भीती वर्तवली जात आहे. प्रत्येक महिन्यात २५ हजार रक्त बाटल्यांची गरज असते. मुंबईच्या सरकारी इस्पितळात केवळ २० हजार बाटल्याच उपलब्ध असल्याने महिन्याकाठी ५ हजार रक्ताच्या बाटल्यांचा तुटवडा असल्याचे महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेचे (एसबीटीसी) सहायक संचालक डॉ. अरुण थोरात यांनी ‘महानगर’ला सांगितले. एप्रिल ते जूनमधील हा रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी एसबीटीसीकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबवली जात आहे. सामाजिक संस्थांकडून रक्तदानाची अधिकाधिक शिबिरे घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबईमध्ये रक्तदान करणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण मोठे आहे. मात्र उन्ह्याळ्यात नागरिकांचा बाहेरगावी फिरायला जाण्याचा जास्त कल असतो. उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन येणारा अशक्तपणा, थकवा यामुळे तरुणाईप्रमाणे सर्वसामान्य नागरिकही रक्तदान शिबिरांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे एप्रिल ते जूनदरम्यान मुंबईत रक्ताचा मोठ्याप्रमाणात तुटवडा जाणवत आहे. थॅलेसेमिया, हिमोफिलिया अशा रुग्णांना रक्ताची अधिक आवश्यकता असते. यातच अनेक रुग्णांचा उन्हाळ्याच्या सुटी धरून शस्रक्रिया करण्याकडे कल असतो.

- Advertisement -

मुंबईमध्ये साधारण एप्रिल ते जूनदरम्यान रोज ८०० ते ९०० आणि महिन्याला २५ हजार रक्ताच्या बाटल्यांची आवश्यकता असते. मात्र रक्तदान शिबिराला मिळणाऱ्या अल्प प्रतिसादामुळे या महिन्यांमध्ये केवळ २० ते २१ हजार इतक्याच रक्ताच्या बाटल्या जमा होतात, अशी माहिती एसबीटीसी सहायक संचालक डॉ. अरुण थोरात यांनी दिली. एप्रिल, जूनप्रमाणेच ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्येही नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेरगावी फिरायला जात असल्याने त्यावेळीही रक्ताचा तुटवडा जाणवतो असेही त्यांनी सांगितले. रक्ताचा तुटवडा जाणवू नये, यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

रक्तदान समितीची स्थापना

एप्रिल ते जूनदरम्यान भेडसावणाऱ्या अपुऱ्या रक्ताच्या पुरवठ्याचा सामना करण्यासाठी एसबीटीसीतर्फे २० सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये उमंग फाऊंडेशन, रिलायन्स फाउंडेशन, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट, लालबागचा राजा मंडळ, संत निरंकारी, नरेंद्र महाराज, अनिरुद्ध बापू, रेल्वे युनियन, कच्छ योग, थिंक फाऊंडेशन, तरुण मित्र मंडळ, रोटरी क्लब, इंडियन मेडिकल असोसिएशन या संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. या संस्था या कालावधीत मोठ्याप्रमाणात रक्तदान शिबीर भरवतात.

- Advertisement -

डॉ. राजश्री कटके, अधिक्षक, कामा रुग्णालय

वाढत्या उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होण्याचे प्रमाण अधिक असले तरी या कालावधीत लिंबू पाणी किंवा भरपूर पाणी प्यायल्यास आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी अधिकाधिक पाणी पिऊन आरोग्य उत्तम राखावे व निसंकोचपणे रक्तदान करावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य असल्यास कोणताही दुष्परिणाम होत नाहीत.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -